कृषी अवजारांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : राजाभाऊ शेलार

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : जिल्हा परिषद सेस २०२१-२२ अंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून विविध अवजारांसाठी ५० ते ७५ टक्के थेट लाभ हस्तांतरण योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे. त्याचा लाभ तालुक्यातील पात्र व गरजू लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत डिझेल इंजिन, सायकल कोळपे, कडबाकुट्टी ल, पाईप, कॅनव्हास ताडपत्री, बॅटरी, स्प्रे पंपसाठी प्रस्ताव घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर सोयाबीन व भात पेरणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीची अधिकृत पावती व टॅग प्रस्तावासोबत सादर करावा. अल्पभूधारक शेतकरी, महिला, मागास, अपंग लाभार्थीस प्राधान्य देण्यात येणार आहे. यापूर्वी लाभ न घेतलेल्या शेतकरी लाभार्थीनी नमुन्यातील अर्ज, खातेउतारा सातबारा, आधारकार्ड, बँक पासबूक झेरॉक्स आदींसह परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभाग पंचायत समिती पाटण येथे पुढील आठ दिवसात समक्ष सादर करावेत, असे आवाहनही सभापती शेलार यांनी केले आहे.

यावेळी उपसभापती प्रतापराव देसाई, मीना साळुंखे, व्ही. बी. विभूते, राजाराम लोखंडे आदी उपस्थित होते.