विंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .

मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कराड-ढेबेवाडी मार्गावर कणसेमळा विंग (ता. कराड) नजीक शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या अपघातातील आणखी एका जखमीचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. एकाच कॉलनीतील चौघांपैकी दोघां मित्रांचे निधन झाल्याने आगाशिवनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

जयदीप उर्फ अभिजीत शांताराम जाधव ( वय २४,रा.गणेश कॉलनी आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड ) असे निधन झालेल्या युवकाचे नाव आहे.

आगाशिवनगर येथील चार युवक शुक्रवारी(ता.१६) मध्यरात्री विंग दिशेला कारमधून जात असताना कणसेमळा नजीक धोकादायक वळणावर कार चालकाचा ताबा सुटून कार पलटी झाली होती.जखमींचा जीव वाचवण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक खाडे यांच्यासह ग्रामस्थांनी कारचे दरवाजे तोडून जखमींना रूग्णालयात पाठवले मात्र अमर पंजाबराव कचरे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. तर जयदीप व अन्य दोघे निखिल सचिन कालेकर (वय २२), धैर्यशील प्रकाश कदम-पाटील ( वय २५ सर्व रा. गणेश कॉलनी, आगाशिवनगर) हे गंभीर जखमी झाले होते.

जयदिपच्या डोक्याला जबर मार लागल्याने व अधिक रक्तस्राव झाल्याने त्याच्यावर कोल्हापूर येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. तीन दिवस युद्धपातळीवर उपचार सुरू होते.मात्र प्रकृती औषधोपचारास साथ देत नव्हती.मंगळवारी सकाळी उपचार घेत असताना त्याचे निधन झाले. सकाळी अकरा वाजता कोल्हापूरहून आगाशिवनगर येथे मृतदेह आणण्यात आला. मृतदेह पाहताच जाधव कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्याच्यावर कराड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक व जयदिपच्या मित्रांनी गर्दी केली होती.

जयदिपने अभियांत्रिकिचे शिक्षण पूर्ण केले होते. पुणे येथील कंपनीत त्याची इंटरव्हुव होवुन या आठवड्यात नोकरीस लागणार होता. त्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. जयदिप हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील स्टॅम्पव्हेंडर आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील, बहिण असा परिवार आहे. एकुलता एक मुलाच्या मृत्यूने जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.