नवी मुंबईत एमपीएससी मुद्यावरून मनसेचे आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात

 


नवी मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यावरुन राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मनसेचे नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मनसे कार्यकर्ते नवी मुंबईतून विधानभवनाकडे मोर्चाने निघाले असताना पोलिसांनी त्यांना वाटेतच ताब्यात घेतले.

आज सकाळी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे हे आपल्या १५० ते २०० कार्यकर्त्यांसह वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे निघाले. त्याठिकाणी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन हे सर्वजण विधानभवनाच्या दिशेने पायी निघाले होते.मात्र काही अंतर चालून गेल्यानंतर पोलिसांनी या सर्व मोर्चेकऱ्यांना अडवले आणि गजानन काळे यांच्यासह ४० ते ५० कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून नंतर जामिनावर सोडून दिले. यावेळी गजानन काळे म्हणाले की, "स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर सरकारने केवळ एक समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु ज्या एमपीएससी मार्फत परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये सदस्यांचे पुरेसे संख्याबळ नाही. सध्या केवळ दोन सदस्य याचे काम पाहत आहेत. हे खूपच दुर्दैवी आहे. त्यामुळे सरकारचा निषेध करत आम्ही आता विधानभवनाच्या दिशेने निघालो आहोत. आज हजारो एमपीएससी उत्तीर्ण मुले नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या सोशल मीडियावर देखील 'मी तहसीलदार,मी बेरोजगार' असे बोर्ड घेऊन असणाऱ्या तरुणांचे फोटो व्हायरल होत आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारची दखल सरकार घेणार नसेल तर मनसेला आक्रमक पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय नाही असे काळे म्हणाले.