"पीएम किसान" बाबत आवाज उठवा ; मारुती मोळावडे यांची खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.
तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांसाठी पीएम किसान योजना लागू करण्यात आली आहे. मात्र, या योजनेत त्रुटी आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. वरिष्ठ पातळीवर शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत उपाययोजना करण्यास सरकारला भाग पाडावे, अशी मागणी तळमावले (ता. पाटण) येथील जन सहकार निधी या संस्थेचे चेअरमन मारुती मोळावडे यांनी केली आहे.
जनसहकार निधी या संस्थेचे चेअरमन मारुती मोळावडे यांची सातारा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या (दिशा) सदस्यपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून तालुक्‍यातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. तसेच केंद्र शासनाच्या विविध योजना दिशा कमिटीद्वारे लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत, तसेच निवेदनात म्हटल्यानुसार पीएम किसान योजनेचा लाभ अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तर काहींना फक्त एकच हप्ता मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांचे हप्ते दुसर्‍याच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. तर काही लाभार्थी शेतकरी जिवंत असतानाही ते मयत झाले आहेत, असे दाखवत आहे. अनेक चुका या योजनेत निर्माण झाल्या आहेत आणि याची दुरुस्ती बँक पातळीवर होत नाही. तरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा, म्हणून लोकसभेच्या सभागृहात आवाज उठवत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मारुती मोळावडे यांनी केली आहे. 
दरम्यान, पीएम किसान योजनेपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन मारुती मोळावडे यांनी केले आहे.