कुंभारगाव ग्रामपंचायतीने अज्ञाताविरुद्ध केली ढेबेवाडी पोलिसात तक्रार दाखल.

दैनिक कृष्णाकाठच्या वृत्ताची ग्रामपंचायतीने घेतली तातडीने दखल.




ढेबेवाडीचे स.पो.नि संतोष पवार यांना तक्रारीचे निवेदन देताना सरपंच सारिका पाटणकर,उपसरपंच राजेंद्र चव्हाण,ग्रामसेवक अनिल जाधव व पोलीस पाटील अमित शिंदे .

कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
पाटण तालुक्यातील कुंभारगाव हे गाव सध्या कोरोनाचे हॉस्पॉट बनलेआहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित रुग्णांचाआकडा शंभरी पार झाला तर कोरोनाने नऊ ते दहा जणांचा बळी घेतला ही दुर्दैवी बाब आहे. 
कुंभारगाव ग्रामपंचायतीने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत व कोरोना कमिटीची मिटींग घेवून दहा जुलै रोजी कोरोनाला रोखण्यासाठी एक मताने आठवडाभराचा जनता कर्फ्यू चा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणीही केली सर्व मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद केले. सर्वत्र कोरोना संसर्गाचे फलक लावले मात्र चारच दिवसात काही बेफिकीर नागरिकांनी  बंदिस्त केलेले रस्त्याचे कुंपण तोडून रस्ते मोकळे केले. त्यावरील कोरोना संसर्गाचे फलकही रस्त्याच्या कडेला फेकून दिले.
कोरोना संसर्ग वाढण्यासाठीच जणू रस्ता मोकळा केला की काय ? या घटनेवर अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. 

या घटनेचे सविस्तर वृत्त दैनिक कृष्णाकाठ ने काल प्रसिद्ध केले व अशा बेजबाबदार नागरिकांना शोधून काढून कारवाई करण्याची प्रशासनाकडे मागणी केली हे वृत्त प्रसिद्ध होताच ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका पाटणकर, उपसरपंच राजेंद्र चव्हाण, ग्रामसेवक अनिल जाधव, पोलीस पाटील अमित शिंदे तसेच कोरोना कमिटी सदस्य यांनी तातडीने या वृत्ताची दखल घेऊन बंदिस्त रस्त्याचे कुंपण तोडणाऱ्या व ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना शासन व्हावे म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने अज्ञाता विरुद्ध ढेबेवाडी पोलिसात तक्रार अर्ज दिला व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.