मुंबईत काँग्रेसच्या आंदोलनाची बैलगाडी कोसळली,भाई जगताप पडले


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईतील अ‍ॅन्टॉप हिल येथील भरणी नाका परिसरात इंधन दरवाढीसह महागाईविरोधात आज मुंबई कॉँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी बैलगाडीवर चढून भाई जगताप यांच्यासह कॉँग्रेस कार्यकर्तेे केेंद्र सरकारविरोधात मोठमोठ्याने घोषणाबाजी करत होते. यावेळी बैलगाडीवर क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्तेे जमा झाल्याने बैलगाडी कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

काँग्रेसने महागाई विरोधात दहा दिवसांचे आंदोलन पुकारले आहे. बुधवारपासून आंदोलन सुरू झाले आहे. यामध्ये महिला काँग्रेसनेही राज्यभर चूल मांडून आंदोलन केले आहे. संपूर्ण राज्यभर काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. आज अ‍ॅन्टॉप हिल येथे कॉँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्या बैलगाडीवर निदर्शने करण्यात येत होती ती बैलगाडीच उलटली आणि दुर्घटना घडली. क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्तेे बैलगाडीवर चढले होते. स्वतः भाई जगताप या बैलगाडीवर होते. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र बैलगाडीचे नुकसान झाले आहे. यावेळी भाई जगताप यांनी केंद्र सरकारने इंधन दरवाढीसह गॅसचे भावही मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. या भाववाढीमुळे सर्व सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. एकीकडे कोरोनाची परिस्थिती असताना हाताला काम नाही. त्यामध्ये ही दरवाढ होत आहे. अशा या दुहेरी संकटात नागरिक अडकला आहे. या परिस्थितीचा विचार करून लवकरात लवकर दरवाढ कमी करावी, अशी मागणी केली.