प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत माथाडी कामगारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : काँग्रेस पक्ष नेहमीच कष्टकरी, कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि भविष्यातही कामगारांच्या हितासाठी उभा राहिल, अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.टिळक भवन येथे अखिल भारतीय माथाडी, सुरक्षारक्षक, श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेचे नेते राजन म्हात्रे, अरुण रांजणे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने माथाडी कामगारांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, उपाध्यक्ष भाई नगराळे, किसान काँग्रेसचे शाम पांडे, बद्रुद्दीन जमा, आदी उपस्थित होते.

माथाडी कामगार हा मुळात काँग्रेसच्या विचारसरणीचा आणि याच पक्षाशी जोडलेला होता. परंतु, आधी अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आमदार नरेंद्र पाटील यांनी भाजपचा मार्ग धरला. त्यानंतर बाबूराव रामिष्टे यांचे चिरंजीव अविनाश रामिष्टे यांनीही भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे माथाडी कामगारांचे नेतृत्वच शिल्लक राहिले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर राजन म्हात्रे आणि अरुण रांजणे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. अखिल भारतीय माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते अविनाश रामिष्टे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर राजन म्हात्रे आणि अरुण रांजणे यांनी दोन वर्षांपूर्वी बाहेर पडून अखिल भारतीय माथाडी, सुरक्षारक्षक, श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियन या नव्या संघटनेची स्थापना केली होती. अल्पावधीतच त्यांनी चांगला जम बसविला असून संघटनेची सभासद संख्या सात ते आठ हजार कामगारांवर गेली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षालाही चांगले बळ मिळणार अाहे. त्याचबरोबर राजन म्हात्रे आणि अरुण रांजणे यांनाही राजकीय संरक्षण आणि मदत मिळाल्यामुळे माथाडी चळवळीत अधिक जोमाने काम करण्याची संधी मिळणार आहे.