'शिवशाही' सरपंच संघ विकासकामाच्या बाबतीत राज्यात आदर्श ठरेल : गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई

शिवशाही सरपंच संघ पाटण विधानसभा स्थापनेची घोषणा.


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
सरपंचानी आपली कर्तव्ये यशस्वीपणे पार पाडून शासनाच्या विविध योजना गावांतील तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी पाटण विधानसभा मतदारसंघात स्थापन करण्यात आलेला शिवशाही सरपंच संघ राज्यात एक आदर्श संघ म्हणून काम करेल अशी ग्वाही देऊन या शिवशाही सरपंच संघाने राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सत्तेचा फायदा आपल्या मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी घ्यावा तसेच माझ्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या शिवशाही सरपंच संघ विकासकामाच्या बाबतीत राज्यात आदर्श ठरेल असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.ते दौलतनगर ता पाटण येथे पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावच्या सरपंच उपसरपंच यांना मार्गदर्शन करताना आयोजित सरपंच परिषेदेमध्ये बोलत होते.

              यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते यशराज देसाई,जयराज देसाई,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,पंजाबराव देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

             मंत्री ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले, पाटण विधानसभा मतदार नव्याने स्थापन झालेल्या या सरपंच संघामुळे गावाचा कारभार चांगल्या पद्धतीने करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ तयार झाले आहे त्यामाध्यमातून सरपंच संघाने गावाचा कायापालट केला पाहिजे. ५ वर्षांनंतर ग्रामपंचायतीने काय केले अशी विचारणा केल्यानंतर त्यांच्यासमोर आपण केलेल्या कामाचा आदर्श गावांपुढे निर्माण झाला पाहिजे. पाटण तालुक्यामध्ये बहुतांशी ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेचे सरपंच आहेत. त्यांनी त्याचा उपयोग गावामध्ये चांगले कामे करण्यासाठी केला पाहिजे. गावामध्ये शासनाच्या विविध योजना राबविल्या पाहिजेत,मात्र बहुतांशी सरपंचाना शासनाच्या चांगल्या योजनांची माहीती नसल्यामुळे ग्रामसेवकांनी सांगायचे आणि सरपंचांनी ऐकायचे हा कारभार कुठेतरी थांबला पाहिजे. राज्य सरकार शासनाच्या विविध योजनेसाठी निधी खर्च करीत असते.त्यामुळे चांगल्या योजना राबविण्यासाठी सर्व सरपंचांनी यांनी एका छता खाली येऊन गावांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे.त्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः आणि सरपंच संघ एकत्र बसून समोरासमोर बसून चर्चा करून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आणि शिवशाही सरपंच संघाचे नाव संपूर्ण राज्यात अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी शासनाच्या विविध योजनांची ग्रामस्तरावर अंमलबजावणीसाठी नजीकच्या काळात संघाच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन ही करणार असल्याचे ही ना. शंभुराज देसाई यांनी सांगितले. यावेळी शिवशाही सरपंच संघ पाटण विधानसभा मतदार संघ या संघाची तालुका कार्यकारणी स्थापना केल्याचे जाहीर करण्यात येऊन या कार्यकारिणीत तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणातील एका सरपंचाची सदस्य म्हणून नियुक्ती ही करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य विजय पवार यांनी केले तर आभार पंचायत समिती सदस्य संतोष गिरी यांनी मानले.यावेळी पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावचे सरपंच व उपसरपंच यांची उपस्थिती होती.

____________________________________
शिवशाही सरपंच संघ राज्यात आदर्श ठरेल.
पाटण तालुक्यामध्ये बहुतांशी गावांमधील सरपंच आणि उपसरपंच हे शिवसेनेचे नेतृत्व मानणारे असून राज्य शासनाच्या वेग-वेगळया योजना ग्रामीण पातळीवर राबविण्यामध्ये यशस्वी होऊन त्याच उद्देशाने स्थापन केलेला शिवशाही सरपंच संघ पाटण विधानसभा मतदारसंघ हा राज्यात आदर्श ठरेल असा विश्वास ही मंत्री ना.शंभुराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
____________________________________