विजेचा दाब वाढल्याने पाटणमध्ये हजारोंचे नुकसान

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : अचानक विजेचा दाब वाढल्याने अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळाल्याची घटना शहरातील यशवंत कॉलनीत घडली. या प्रकरणी महावितरणने तातडीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू होता. शहरातील यशवंत कॉलनी परिसरात अचानक विजेचा दाब वाढल्याने तेथील अनेक नागरिकांच्या घरातील टि.व्ही; संगणक बॅटरी, राऊटर अडाप्टर, ट्यूब, ब्लब, इन्व्हर्टर यासह इतरही विद्युत साहित्य खराब झाले आहे. याबाबतची तक्रार तेथील रहिवासी प्रा. दत्तात्रय थोरात यांनी महावितरणकडे लेखी स्वरूपात केली आहे. त्यांनी परिसरात माहिती घेतली असता ७ घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्याचे नुकसान झाले असल्याचे आढळून आले. तसेच अन्य नागरिकांकडूनही माहिती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

गतवर्षी विक्रमनगर परिसरात ही अशीच घटना घडली होती. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे. भितीपोटी अनेक नागरिकांनी आपापल्या घरातील विद्युत पुरवठा बंद ठेवत अंधारात रात्र काढणे पसंत केले. दुसऱ्या दिवशी सकाळी देखील कमी अधिक दाबाने विद्युत पुरवठा सुरू होता. त्यामुळे महावितरणने तातडीने याबाबत उपाययोजना करावी व भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये, याची खबरदारी घ्यावी तसेच संबंधितांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.