अथणी-रयतचे येत्या हंगामात 5 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ऊस तोडणी वाहतूक करार पूर्ण



अथणी शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांची माहिती.

अथणी-रयत कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करार ऍडव्हान्स चेक चे वाटप करताना रविंद्र देशमुख, विनोद पाटील, शैलेंश देशमुख, महादेव पाटील व इतर.

उंडाळे  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : शेवाळेवाडी-म्हासोली, ता. कराड येथील अथणी-रयत साखर कारखान्याने सन 2021-22 च्या येत्या गळीत हंगामात 5 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती अथणी शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी दिली.
यावेळी तोडणी वाहतूकदारांना तोडणी वाहतुकीच्या पहिल्या हप्त्याचे वितरणही करणेत आले. रयतचे चेअरमन ॲड.उदयसिंह पाटील - उंडाळकर, युनिट हेड रविंद्र देशमुख, शेती अधिकारी विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

अथणी-रयत कारखान्याचे सन 2021-22 हंगामासाठी तोडणी वाहतुकीचे करार पूर्णत्वाकडे आले असून आतापर्यंत 300 ट्रक / ट्रॅक्टर आणि 200 अंगद गाडी चे करार पूर्ण झाले आहेत.या वाहतूक दारांना तोडणी वाहतूक करारापोटी 3 लाख रुपये पहिला हप्त्याचे वाटप चेक द्वारे करणेत आले.

तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज झाली असून या हंगामात 5 लाख मे टन गळीत करण्याचे दृष्टीने नियोजन केले आहे. सन 2020-21या मागील गळीत हंगामात 4 लाख 60 हजार मे. टन उसाचे गाळप करून सरासरी 12.34 टक्क्यांनी साखर उतारा राखत 5 लाख 60 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले होते. शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखविलेला विश्वास व शेतकऱ्यांचे हित विचारात घेवून गाळपास आलेल्या उसास 2900 रुपये एकरक्कमी ऊस दर व्यवस्थापनाने दिला होता. 

एफ.आर.पी. 2867 रुपये इतकी असताना एफ.आर.पी.पेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. व यापुढेही उसाला वेळेवर आणि चांगला दर देण्याची भूमिका अथणी शुगर्सची असल्याचे योगेश पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगितले. ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करुन सन 2021-22 करीता निश्चित केलेले 5,00,000 मे. टन गळीताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ऊस उत्पादकांनी आपला जास्तीतजास्त ऊस अथणी शुगर्स रयत युनिट या कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.