"ग्रामीण विकास संस्कार शिबिर" उपक्रम कौतुकास्पद : उपशिक्षणाधिकारी श्रीकांत जगदाळे

उंडाळे |कृष्णाकाठ वृत्तसेवा:                                

उंडाळे येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचा उन्हाळी सुट्टीतील व लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांच्या वर चांगले संस्कार व्हावेत म्हणून संस्थेच्या वतीने "ग्रामीण विकास संस्कार शिबिर" हा अभिनव उपक्रम ता. 7 ते 12 जून अखेर ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन आज सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्रीकांत जगदाळे, संस्थेचे संचालक ॲड. आनंदराव पाटील, प्राचार्य बी. आर. पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उत्साहात उद्घाटन करण्यात आले.            
यावेळी बोलताना सातारा जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी श्री. जगदाळे म्हणाले ग्रामीण विकास शिक्षण संस्था उंडाळे ने सुरु केलेला बाल संस्कार शिबिराचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. covid-19 कालावधीमध्ये प्रत्यक्ष अध्यापन करता येत नसले तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा नव्याने शाळा सुरू होत असताना अशा पद्धतीचा उपक्रम मुलांचे व्यक्तिमत्व सुधारण्यास व शिक्षणाची गोडी वाढण्यास उपयुक्त ठरेल. कला, क्रीडा, आरोग्य, संस्कृती, विज्ञान यांचे पैलू पाडण्यास ऑनलाइन शिक्षणाचा हातभार लागत आहे. 

यावेळी अँड आनंदराव पाटील, प्राचार्य बी.आर. पाटील यांची भाषणे झाली. हा अभिनव उपक्रम इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असून व्हाट्सअप, युट्यूब याद्वारे ऑनलाइन आयोजित केला असून शिबिर सकाळी नऊ ते दहा या वेळेत आयोजित केले आहे. 

या शिबिरामध्ये (ता. सात) सुहास प्रभावळे सुंदर हस्ताक्षर प्रात्यक्षिक, (ता 8) राजाराम सुतार योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिके, (ता. 9) ऋषिकेश पोटे कलात्मक वस्तू ची निर्मिती, (ता 10) डॉ. राहुल फासे कोरोना काळात घ्यावयाची काळजी व बाळकृष्ण मिरजकर मास्क तयार करणे, (ता. 11) रवींद्र रमतकर दैनंदिन जीवनातील विज्ञान, व शुभांगी पाटील विज्ञानातील प्रयोग, (ता 12) हणमंत सूर्यवंशी पर्यटन व छायाचित्रे, यानंतर शिबीराचा समारोप होणार असून कराड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. शबनम मुजावर व ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे निरीक्षक डॉ. आर. ए. कुंभार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. शिबीर संपल्यानंतर जे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. 

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी हणमंत सूर्यवंशी, गणेश शेवाळे, ऋषिकेश पोटे, शंकर आंबवडे,धनंजय पवार परिश्रम घेत आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे .