शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे : खा श्रीनिवास पाटील

 


कराड : कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

      सातारा जिल्ह्यातून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ लसीकरणाची सुविधा प्राधान्याने देण्यात यावी अशी सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली आहे.

     सातारा जिल्ह्यातून उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी, तसेच दुर्धर आजारावरील औषध उपचारासाठी अथवा नोकरीसाठी परदेशी जाणा-या येथील नागरिकांना लसीकरण सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांकडून होत असल्याने याबाबत खा.श्रीनिवास पाटील यांनी साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना पत्र लिहून ही सूचना केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे, परदेशात जाताना विश्व स्वास्थ्य संस्थेने मान्यता दिलेल्या लसीचं ग्राह्य धरल्या जातात. बहुतांशी मुलांनी उच्च शिक्षणासाठी परदेशी स्थित विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. त्यासाठी त्यांना सप्टेंबर महिन्यात परदेशी शिक्षणासाठी जायचे आहे. परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जावू नये. तर काही तरूण मुले नोकरीसाठी परदेशी जाणार आहेत. तसेच काही नागरिक देखील औषधोपचार करण्यासाठी परदेशात जाऊ इच्छितात. 

     सदर समस्येचा विचार करुन सातारा जिल्ह्यातून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, औषधोपचार आणि नोकरीसाठी जाणा-या 45 वर्षांच्या आतील नागरिकांसाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास लसीकरण केंद्रावर ‘वॉक इन’ पध्दतीने लसीकरणाची व्यवस्था करून लस देण्यात यावी अशी सूचना त्यांनी केली आहे.