कोरोना काळात कृषी उत्पन्नामुळे अर्थव्यवस्था टिकून : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

 


कृषि संजीवनी कार्यक्रमात बियाणे वाटप प्रसंगी ना. शंभूराज देसाई, गुरुदत्त काळे, दौलत चव्हाण, विजय पवार, सुनिल ताकटे.

पाटण  | कृष्णाकाठ वृत्तसेवा  : कोरोना काळामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये केवळ शेतकरी आणि कृषी विभागामुळे कृषी उत्पन्नात वाढ झाल्याने राज्याची व देशाची अर्थव्यवस्था टिकून राहिली, असा विश्वास राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत नवारस्ता, ता. पाटण येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.      

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे उपस्थित होते.

ना. देसाई म्हणाले, शासनामार्फत शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना राबविल्या जात असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना योजना समजावून सांगाव्यात आणि त्यांना योजनांमध्ये समाविष्ट करून घ्यावे.

यावेळी गुरुदत्त काळे यांनी कृषी संजीवनी मोहिमेची माहिती दिली. दौलत चव्हाण यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. डॉ. खांडेकर यांनी खरीप हंगामातील पिकांचे व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. सुनिल ताकटे यांनी ऊस उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी ना. देसाई यांच्या हस्ते तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येऊन कृषी विभागामार्फत बियाणे व यूरिया ब्रिकेट्सचे वाटप करण्यात आले.

यावेळी जालिंदर पाटील, सरपंच विष्णू पवार, कालवडे येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ भरत खांडेकर, तंत्र अधिकारी दत्तात्रय खरात, तालुका कृषी अधिकारी सुनील ताकटे, मंडल कृषी अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कृषी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व परिसरातील शेतकऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.