मुंबईतील खासगी रुग्णालयांमधील लसींचे ऑडिट करण्याची मागणी

नगरसेविका सोनम जामसुतकर यांचे आयुक्तांना निवेदन.



मुंबई  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कांदिवली परिसरात अलीकडेच बनावट लसीकरणाचा प्रकार उघडकीस आला होता.या बनावट लसी काही खासगी रुग्णालयातून दिल्या गेल्या होत्या.या पार्श्वभूमीवर मुंबईतील रुग्णालयांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या लसींचे ऑडिट करण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांनी मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही खासगी रुग्णालयांमधून लसींचा गैरवापर होऊ नये, म्हणून रुग्णालयांच्यावतीने खरेदी करण्यात येणाऱ्या लसींचे ऑडिट होणे आवश्यकआहे. सध्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम महापालिकेच्यावतीने राबवली जात आहे. यामध्ये ४५ ते ६० वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील व्यक्तींना, तसेच आरोग्य विभाग व फ्रंटलाईन वर्कर यांना महापालिका व शासकीय केंद्रांमध्ये मोफत लसीकरण केले जाते. परंतु १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण हे शुल्क आकारुन काही खासगी रुग्णालयातूनही केले जाते. तसेच सध्या एनजीओच्या माध्यमातून रुग्णालयांशी करारनामा करत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लसीकरण केले जाते. यासाठी शुल्क आकारले जात असले, तरी कांदिवलीत बनावट लसीकरणाचा प्रकार उघडकीस आल्याने अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळेच खासगी रुग्णालयाकडे असणाऱ्या लसींचे ऑडिट करावे अशी मागणी जामसुतकर यांनी केली आहे.