मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
यंदाही आषाढी वारीसाठी पालख्या बसमधूनच येणार असल्याचे आज शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर मानाच्या दिंड्या पायी येणार असून एकादशी दिवशी शहरातील १९५ महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन करता येणार आहे, असे शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
मानाच्या १० पालखी सोहळ्यांच्या प्रस्थान सोहळ्याबाबत शासनाच्या आदेशात म्हटले आहे की, देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० तर उर्वरित ८ सोहळ्यांसाठी ५० वारकर्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. मानाचे पालखी सोहळे प्रस्थान ठिकाणाहून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरकडे दीड किमी अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्यात परवानगी देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होईल तर पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय महापूजा, विठ्ठलाशी संतांच्या भेटी गेल्यावर्षीप्रमाणेच करण्यात येणार आहे. तर नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. एकादशी दिवशीच्या रथोत्सवासाठी रथाऐवजी स्वतंत्र वाहनाने १० मानकरी आणि मंदिर समितीचे ५ कर्मचारी असे १५ व्यक्ती येतील. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक असणार आहे. संताच्या पादुका भेटीदरम्यान मानाच्या पालखी सोहळ्यातील ४० वारकर्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर वारीसाठीच्या २ बसमध्ये प्रत्येकी २० असे ४० वारकर्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.