ग्रामस्थांनो सावधान...! कुंभारगावची कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल.


छाया : महेश कचरे , कालसंगम फोटो

कुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कुंभारगाव ता पाटण येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज कुंभारगाव येथे 42 जणांची कोरोना अँटीजेन टेस्ट करण्यात आली यामध्ये 6 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. यामुळे कुंभारगाव मध्ये एकच खळबळ निर्माण झाली. वाढती कोरोना बाधित संख्या कुंभारगावसाठी जणू धोक्याची घंटा ठरत आहे. यामुळे कुंभारगावची वाटचाल जणू हॉटस्पॉट च्या दिशेने सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.         

 कुंभारगाव गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट रोखण्यात यशस्वी झाले होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या 3 महिन्यात कोरोनाच्या बाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत असून ग्रामस्थ प्रशासनाचे नियम जुगारून बेफिकीरपणे सार्वजनिक ठिकाणी विना मास्क वावरत असून सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडाला आहे. एकूण कोरोनाचे गांभीर्य कुणालाही दिसत नसल्याचे चित्र आहे. माहे एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात एकूण 89 रुग्ण बाधित झाले होते.त्यातील 66 जणांनी कोरोनावर मात केली.तर दुर्देवाने यामध्ये 7 जणांचा कोरोनाने बळी घेतला. तर आज अखेर एकूण 16 रुग्ण कोरोना बाधीत असून ते विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. एकूणच कुंभारगाव मध्ये कोरोनाच्या बाधितांची संख्या कमी येत नसल्याची बाब प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या लक्षात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज तळमवाले प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ यू जी गोंजारी, डॉ. केतकी यांच्या मार्गदर्शनाखाली बाधिताच्या संपर्कातील नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली यामध्ये 6 जणांचे रिपोर्ट बाधित आले आहेत. कुंभारगाव परिसरातील नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा विनाकारण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, घरीच रहा सुरक्षित रहा, सोशलडिस्टंगचे पालन करा व कोरोनाला हरवा, प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन ग्रामस्थांना आरोग्य विभागा मार्फत करण्यात आले आहे.  

या टेस्टिंग कॅम्प मध्ये तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यू जी गोजारी, डॉ केतकी यांचे मार्गदर्शना खाली CHO, डॉ सुप्रिया यादव, आरोग्य सेविका ए एम कांबळे, आरोग्य सेवक रोहीत भोकऱे, आशा सेविका सुनीता सुतार, पोलीस पाटील अमित शिंदे आदींनी सहभाग घेतला.               

सोमवार दि 21/6/2021, रोजी कुंभारगाव मध्ये सर्व ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस पाटील अमित शिंदे, सरपंच सौ. सारिका पाटणकर यांनी केले आहे.