अखेर राज्यातील १२ वीची परीक्षा रद्द ; मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्यामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षा होणार की नाही याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. अखेर आज राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेतून दिली. 

वडेट्टीवार म्हणाले की, आज आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आणि नंतर राज्यात ज्यांचा परीक्षा रद्दच्या निर्णयाला विरोध होता, त्यांचाही विरोध मावळला. तत्पूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतची आपली भूमिका जाहीर केली होती. मात्र औपचारिकपणे प्रस्ताव मदत व पुनर्वसन खात्याकडे पाठवून या प्रस्तावास मंजुरी देत राज्य सरकार आणि मदत व पुनर्वसन खात्याने हा निर्णय घेतला अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.