सरनाईकांबद्दल लवकरच बातमी मिळेल खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

 


मुंबई  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्याबाबत तुम्हाला लवकरच बातमी मिळेल, असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. संजय राऊत यांनी आज शनिवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या बैठकीत राज्यातील अनेक मुद्यांवर चर्चा झाली. विशेष करून भाजपची जुळवून घ्या, असे पत्र लिहिणाऱ्या प्रताप सरनाईक यांच्याबद्दलही या बैठकीत चर्चा झाली.राऊत म्हणाले की,मी प्रताप सरनाईकांशी दोन दिवसांपूर्वी फोनवरुन बोललो, त्यांनी खुलासा केला, मी माझ्या भावना व्यक्त केल्या. त्या व्यक्त करत असताना सरनाईकांनी स्पष्टपणे सांगितले की मी आजन्म शिवसेनेतच राहीन, आणि शिवसेनेतच मरेन. प्रताप सरनाईकांबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल, असे राऊत यांनी म्हटले. ईडीच्या कारवाईवर आमचं लक्ष आहे. केंद्रीय पातळीवर दबाव असू शकतो.प्रताप सरनाईकांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्हाला जाणवले काही केंद्रीय यंत्रणा जाणुनबुजून ‘वडाची साल पिंपळाला’ लावण्यचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.पक्ष संघटना बळकट असेल तर सरकार आहे त्यापेक्षा मजबूत होईल, सरकार प्रदीर्घ काळ टिकेल, मुख्यमंत्री आमचाच राहील. त्यासाठी संघटनात्मक चर्चा झाली. अनेक विषय महाराष्ट्रात सुरु आहे, विधानसभा अधिवेशनाची त्यांची तयारी सुरु आहे, असे राऊत यांनी शेवटी सांगितले.