कृष्णा कारखाना निवडणुकीत कॉग्रेसचे युवक नेते ऍड.उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा


कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

 यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय कॉग्रेस चे युवक नेते ऍड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी बहुतांशी कॉग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली.

     गेली अनेक दिवस कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही मोहित्याच्या आघाडीच्या चर्चा चालू होत्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री ,आमदार पृथ्वीराज चव्हाण,ऍड उदयसिंह पाटील यासह नेते मंडळींनी प्रयत्न केले होते. आघाडीच्या चर्चा थांबल्यानंतर कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा यासाठी कॉग्रेसचे युवा नेते उदयसिंह पाटील व कॉग्रेस पक्षाच्या काही पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत कोयना दूध संघावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.या बैठकीत बहुतांशी कार्यकर्यांनी संस्थापक पॅनेलला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर यावेळी बोलताना उदयसिंह पाटील यांनी पक्षातील वरिष्ठ नेते व जेष्ठ कार्यकर्त्यांशी सल्ला मसलत करून याबाबत लवकरच घोषणा केली जाईल असे जाहीर केले होते.

    त्याप्रमाणे ऍड.पाटील यांनी पक्षातील नेते व गटाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांशी कृष्णा निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करून अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला पाठींबा जाहीर करून तशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

  गेली अनेक दिवस कृष्णेच्या निवडणुकीत उंडाळकर समर्थकांसह कॉग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा कोणाला राहणार याची उत्सुकता लागली होती. या निर्णयामुळे उंडाळकर समर्थकासह अनेक कॉग्रेस कार्यकर्ते संस्थापक पॅनेलच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.कृष्णेच्या रणांगणात सर्वांच्याच नजरा कॉग्रेसचे युवा नेते उदयसिंह पाटील यांच्या निर्णयाकडे लागल्या होत्या पाठींब्याचा या निर्णयामुळे संस्थापक पॅनेलला अधिक बळकटी मिळणार आहे.

    माजी सहकार मंत्री स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पश्च्यात होणाऱ्या या कृष्णेच्या निवडणुकीत अविनाश मोहित्याच्या मदतीला कॉग्रेसचे युवक नेते ऍड. उदयसिंह पाटील ठाम उभे राहिल्याने निवडणुकीत संस्थापक पॅनेलची निश्चित ताकद वाढणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.