मुंबईतील एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना १२ जुलैपर्यंत कोठडी

 





मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील आरोपी मुंबई पोलिसांतील एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह संतोष शेलार व आनंद जाधव यांना १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

प्रदीप शर्मा या प्रकरणातील आरोपी असल्याचे मानले जाते, त्यादृष्टीने एनआयए पथकाने यापूर्वी प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा टाकला होता आणि त्यानंतर अटक होण्यापूर्वी प्रदीप शर्माला ताब्यात घेण्यात आले होते आणि त्यांची चौकशी केली जात होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे हे मास्टरमाईंड होते असा दावा एनआयआयएने यापूर्वी कोर्टात केला आहे. शर्मा यांचा निकटवर्तीय समजला जाणारा संतोष शेलार आणि त्याचा साथीदार आनंद जाधव यांनाही आज न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. 

दरम्यान, प्रदीप शर्मा यांनी आज कोर्टात एक अर्ज केला, ज्यामध्ये विशिष्ट कारागृहात मला पाठवण्यात यावं असे म्हटले होते. मात्र कोर्टाने या अर्जावर संबंधित कारागृह प्रशासन विचार करेल असे म्हटले. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार त्यांना तळोजा किंवा ऑर्थर रोड कारागृहात जायचे नव्हते. त्यांना ठाणे कारागृहात जायची इच्छा होती. मात्र कोर्टाने त्यांच्या या मागणीचा विचार केला नाही. सध्या तळोजा कारागृहात या प्रकरणातील सर्व आरोपी बंदिस्त आहेत. ज्यामध्ये सचिन वाझे, रियाझ काझी, सुनील माने, विनायक शिंदे, नरेश गोर आणि आजपासून प्रदीप शर्मा, संतोष शेलार आणि आनंद जाधव यांनाही तळोजामध्ये पाठवण्यात आले. एनआयएने सध्या फक्त मनीष सोनी आणि सतीश मुठेकरी या दोन आरोपींची कोठडी १ जुलैपर्यत वाढवून घेतली आहे. अजूनही या दोघांकडून महत्वाची माहिती मिळू शकते असे एनआयएचे म्हणणे आहे.