ढगफुटीतील शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

 


पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देताना विक्रमबाबा पाटणकर व शेतकरी.

पाटण  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : बुधवार दि. १६ जून रोजी झालेल्या ढगफुटीत पाटण तालुक्यातील केरा विभागात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे १०० कोटींपेक्षा जास्त आहे. भरघोस शासकीय मदतीशिवाय या नुकसानीतून शेतकरी सावरू शकत नाहीत. मणदुरे-केरा विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत सरकारने द्यावी, अशी मागणी राज्याचे सहकार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे केली.

यावेळी मंत्री पाटील यांनी वस्तुस्थिती निहाय पंचनामे करुन या पंचनाम्याचा अहवाल तातडीने मागवून घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. 

ते म्हणाले, पाटण तालुक्यात झालेल्या ढगफुटीने मणदुरे-केरा विभागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीतून शेतकरी सावरणार नसला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी संबधितांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. असे त्यांनी सांगितले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. 

निवेदनात म्हटले आहे की, या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांना स्वतः च शेत शोधण्याची वेळ आली. एका रात्रीत आयुष्यभराची मेहनत वाहून गेली. शेतकऱ्यांचे शेतीपंप वाहून गेले. पाटण पासून ते केरळ, मणदुरे, निवकणे, दिवशी, जुंगटी, चाफोली, आरल, खिवशी, घाणव, आंबवणे, चिटेघर, तामकणे, बोंद्री, कातवडी, मेष्टेवाडी, सुरुल, बिबी, मेंढोशी, साखरी आदी गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांच्या माथ्यावर आले. यासह वाहून गेलेले शेत पुन्हा उभे करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शासन नेहमीप्रमाणे पंचनामे करुन शेतकऱ्यांना शासन नियमाप्रमाणे तुटपुंजी मदत करण्याच्या प्रयत्न करत आहे. १ गुंट्याला ६८ रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा होणार आहे. शेतकऱ्यांचे ढगफुटीने झालेले नुकसान हे न भरून येण्यासारखे आहे. शासनाने याचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना कोकण किनारपट्टीला धडकलेल्या निसर्ग व तौक्ते चक्रीवादळाच्या धरतीवर दिलेल्या मदतीनुसार ढगफुटीने नुकसान झालेल्या पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने अर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज