उपसरपंच अनुज पाटील व सहकार्यांच्या प्रयत्नांना यश.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : वारूंजी, ता. कराड येथील धोकादायक वीज पोल रस्त्यावरून स्थलांतरीत करणे व वाढीव वस्तीपर्यंत नवीन विद्युत पुरवठा करण्यास जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूरी मिळाली आहे. याकामी सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबतचे आदेश अधीक्षक अधियंता महावितरण सातारा यांना दिले आहे. याकामी उपसरंपच अनुज पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.वारूंजी, ता. कराड येथील झुकलेलेे विद्युत पोल, सैल झालेल्या विद्युत वाहिन्यांची दुरूस्ती, आवश्यक ठिकाणी नवीन पोल उभारण्याची आवश्यकता तसेच जुन्या गावाकडे जाणार्यामार्गावर स्ट्रीटलाईट नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. याकामी उपसरपंच अनुज पाटील व त्यांच्या सहकार्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन याकामी सहकार्य करण्याची मागणी केली होती.
दि. 27 मार्च 2021 रोजी संबंधित मागण्याचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले. यात नवीन पोल उभारणे, विद्युत वाहिनी राहत्या घरापासून बाहेर काढणे, झुकलेले पोल सरळ करणे, जिल्हा परिषद शाळा ते स्मशानभूमीपर्यंत स्ट्रीटलाईट बसवणे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.
त्यानुसार सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी वारूंजीसह तांबवे, सैदापूर, निकडी, निसराळे, रहिमतपूर, कालगाव या गावातील धोकादायक पोल स्थलांतर तसेच वाढीव वस्तीपर्यंत नवीन विद्युत पुरवठा करणे आदी कामांना जिल्हा वार्षिक योजना 2021-22अंतर्गत महावितरण संदर्भातील कामांकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे. दि.7 मे 2021 रोजी अधीक्षक बांधकाम विभाग सातारा यांना कळवण्यात आले आहे.
हा निधी उपलब्ध झाल्याने वारूंजी गावातील विद्युत संदर्भात उपसरपंच अनुज पाटील व त्यांच्या सहकार्यांनी मागणी केली सर्व कामे पूर्णत्वास जाणार आहेत. दरम्यान, या निधीतून वारूंजीत कामांना सुरूवातही झाली आहे.