इंधन दरवाढीतून केंद्र सरकारची जनतेकडून करवसुली : आ. पृथ्वीराज चव्हाण


कराड  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत असताना भारतात मात्र, इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत जाऊन आता पेट्रोल १०० रुपयांना तर डिझेल ९२ रुपयांना मिळत आहे तसेच स्वयंपाक गॅस ९०० रुपयांच्या घरात पोहचला आहे. केंद्रातील मोदी सरकारची ही दरवाढ नसून करवाढ आहे. कोरोनासाठी दिलेल्या पॅकेजमधील रक्कम इंधन दरवाढीतून जिझीया कराच्या माध्यमातून वसूल करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. याचा आम्ही निषेध करत आहोत, अशी टिका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, जि प सदस्य शंकर खबाले, पं स सदस्या वैशाली वाघमारे, पं स सदस्य नामदेवराव पाटील, नरेंद्र पाटील, नानासो पाटील, नितीन थोरात, राजेंद्र चव्हाण, शिवाजी मोहिते, प्रदीप जाधव, नानासो जाधव, इंद्रजीत चव्हाण, उदय थोरात, जिल्हा काँग्रेसचे कायदा विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड.अमित जाधव, आदी यावेळी उपस्थित होते. यापुढे आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, इंधन दरवाढ अशीच चालू राहिली तर महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे, त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने पेट्रोल-डिझेल मधून कराच्या रूपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवीत सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. या इंधन दरवाढ विरोधात काँग्रेस पक्ष देशभर व राज्यभर आंदोलन करीत आहे. आजही काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर आंदोलने करण्यात आली. 

२०१४ च्या आधी डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित युपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ वाढलेल्या असतानाही देशांतर्गत पेट्रोल-डिझेल च्या किंमतीवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या युपीए सरकारच्या काळातील किमती व सद्याच्या मोदी सरकारच्या काळातील किमतीशी तुलना करता, जवळपास ५० टक्के एवढ्या कमी असतानाही, मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ केलेली आहे. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे नसून ते फक्त मूठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार आहे. यामुळे इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाही मोदी सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी काहीही प्रयत्न करताना दिसत नाही याचा निषेध हि यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.