लायन्स क्लबने पारधी समाजातील गरीब कुटुंबांना अन्नधान्याची केलेली मदत हे निश्चितच चांगले समाजकार्य: खा. श्रीनिवास पाटील.

 


कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

     अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणे हीच खरी माणुसकी आहे. लायन्स क्लबने पारधी समाजासाठी दिलेली ही मदत नसून मायेने पुढे केलेला हात असल्याचे प्रतिपादन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले.

     कराड येथे लायन्स क्लब, कराड यांच्यावतीने पोलिस स्टेशनच्या आवारात पारधी समाजातील कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप केले. याप्रसंगी ते बोलत होते. पोलिस निरिक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 35 पारधी कुटुंबियांना या किटचे वाटप करण्यात आले.

    खा.पाटील म्हणाले, समाजातील दुर्लक्षित घटकांना कोरोना महामारीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लायन्स क्लब कराड यांनी पारधी समाजातील गरजू व गरीब कुटुंबांना अन्नधान्य स्वरूपात किट वाटप केले हे निश्चितच चांगले समाजकार्य आहे. समजातील गरजू आणि गरीब कुटुंबाचा शोध घेऊन त्यांना या महामारीच्या काळात मदत केली गेली पाहिजे. हे अन्नधान्य स्वरूपातील किट काही काळ या बांधवांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडविण्यासाठी उपयोगी पडेल. कोरोना संपल्यानंतर देखील या बांधवांना आपण सर्वांनी मिळून आधार दिला पाहिजे. त्यांना काही काम देऊन उभे केले पाहिजे. या समाजातील लोकांना निवाराही उपलब्ध करून दिला पाहिजे. याशिवाय त्यांच्या समोर असणा-या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.

     दरम्यान या उपक्रमाबद्दल खा.श्रीनिवास पाटील यांनी लायन्स क्लब व पो.नि.बी.आर.पाटील यांचे कौतुक केले. यावेळी डीवायएसपी डॉ.रणजीत पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुशांत व्हावळ, डॉ.महेश खुस्पे, नईम कागदी, चंद्रकांत सिकची, प्रकाश पोरवाल, संदीप कोलते, विराग जांभळे, प्रकाश वायदंडे आदींसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.