आदर्श पिढी घडवण्यासाठी सर्वांनी शिवचरित्र वाचा,जपा व जगा : प्रा.नवनीत यशवंतराव.

श्री संतकृपा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक व्याख्यानाचे आयोजन.

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा

छत्रपती शिवरायांच्या दृष्टीतून साकारलेले शेकडो गडकिल्ले त्याचे वास्तव आपण आजही पाहतो. त्यांच्या नजरेतून साकारलेल्या अनेक पैलूतून त्यांची इंजिनीअरिंग दृष्टी दिसते म्हणून छत्रपती शिवराय एक अभियंता सुद्धा होते असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते, लेखक प्रा.कु.नवनीत नंदकुमार यशवंतराव यांनी केले.

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा अभियांत्रिकी  महाविद्यालयाच्या "एनएसएस" विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले होते. "छत्रपति शिवराय एक अभियंता" या विषयावरील व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी राजमाता जिजाऊ यांचे वडील लाखोजीराजे जाधवराव यांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत अमरसिंहराजे जाधवराव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्रीमंत अमरसिंहराजे जाधवराव यांनी ही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व व्याख्याना करीता शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे सचिव प्रसून जोहरी,  श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी 250 च्या वर विद्यार्थी या ऑनलाईन व्याख्यानास उपस्थित होते. तसेच झूम व फेसबुक लाईव्ह द्वारे अनेक विद्यार्थ्यांनी या महत्त्वपूर्ण व्याख्यानाचा लाभ घेतला. यावेळी पुढे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.कु.नवनीत नंदकुमार  यशवंतराव म्हणाले शिवरायांनी बांधलेले गड किल्ल्यातून त्यांचे स्थापत्य शास्त्र दिसते, व्यवस्थापन शास्त्र दिसते.

स्वराज्यात महत्वाचा केंद्रबिंदू म्हणजे शेतकरी होय. हा शेतकऱी  सक्षम करण्यासाठी छत्रपती सदैव   प्रयत्नशील असत. तिथे त्यांचे सोशल इंजिनिअरिंग दिसते. चारशे पन्नास वर्षांपूर्वी "पाणी अडवा पाणी जिरवा योजना" ही महत्वकांक्षी योजना राबवून शेतकऱ्यांना आधार दिला व त्यातून शेतीसाठी पाण्याची व्यवस्था निर्माण केली यातून त्यांचे जलव्यवस्थापन पहावयास मिळते. सर्व गडकिल्ले मजबूत बांधले. रायगडावर तर शत्रूला रोखण्यासाठी भव्य महाद्वार, दोन मोठे बुरुज, बुलंद दरवाजा, दोन पायऱ्या मधील अंतर अशा अनेक गोष्टीतून छत्रपतींचे सर्व शास्त्र येथे पाहावयास मिळते.

छत्रपतींचे व्यापारशास्त्र प्रगल्भ होते. व्यापार, उद्योग व लोकांच्या हाताला काम देण्यासाठी जहाजबांधणी महत्त्वाची होती म्हणून त्यांनी पोर्तुगीज मधून जहाज बांधणी कारागीर बोलावून त्यांच्याकडून आपली लोक शिकवून घेतली व त्यातून कुशल कारागीर तयार झाले त्यांच्याकडून जहाजबांधणी करून व्यापार वाढवून आपल्या मालाला भाव मिळवून दिला यातून त्यांचे मार्केटिंग व  व्यापारशास्त्र नजरेस दिसते. या तयार झालेल्या कारागिरांकडून पुढे सक्षम अशी इतर देशांपेक्षा ही प्रभावी अशी लढाऊ जहाजे तयार केली त्यातून त्यांचे युद्धशास्त्र, युद्धनीती पहावयास मिळते. त्या काळातही राजे कामगारांना वेळेवर पगार देत असत कामगार खुश तर काम उत्तम होते असा त्यांचा अनुभव होता. हा त्यांच्या व्यवस्थापनाचा एक भाग होता. यातून ही त्यांचे व्यवस्थापनशास्त्र दृष्टीस पडते.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना व पर्यटकांना संदेश देताना प्रा.कु.नवनीत नंदकुमार  यशवंतराव म्हणाले विद्यार्थ्यांनी गड-किल्ल्यावर ट्रेकिंग करावे. दोन दिवस रहावे. गड किल्ल्यांचा अभ्यास करावा. आपण शिक्षण घेत असलेल्या शिक्षणाच्या दृष्टीकोनातून इतिहासाकडे इंजिनिअरिंग म्हणून पहावे. इतिहासाचा बारकाईने अभ्यास करावा.

आदर्श पिढी घडवण्यासाठी सर्वांनी शिवचरित्र वाचा, जपा व जगा असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. माझे लवकरच "छत्रपती शिवराय समजून घ्या" हे पुस्तक  ऑडिओ व प्रत स्वरूपात उपलब्ध होणार आहे ते पुस्तक आपण निश्चित वाचा, अभ्यासा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.

श्री संतकृपा इंजिनिअरिंगच्या आणि एन एस एस च्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन मेकॅनिकल इंजिनिअरिंगच चे विभागप्रमुख प्रा. भरतराज भोसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.प्रज्ञा कुलकर्णी व त्यांच्या एनएसएस कमिटीतील प्राध्यापकांनी प्रयत्न केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.भरतराज भोसले यांनी केले तर प्रा.सुधीर गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.