अकलूज आगारातील वाहकाचा प्रामाणिकपणा, पैशाचे पाकीट केले परत

 


सीताराम येडगे यांना पैशाचे पाकीट परत करताना वाहक सचिन गरगडे. 

पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा : अकलूज-चिपळूण या एसटी बसमध्ये पडलेले पैशाचे पाकीट संबंधितास परत करून अकलूज आगारातील वाहक सचिन ज्ञानदेव गरगडे यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शनच दाखवून दिले आहे. या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे पाटण आगारातील चालक व वाहकांमधून सत्कार करण्यात आला.

अकलूज आगाराची अकलूज-चिपळूण ही एसटी बस रविवारी पाटण आगारामध्ये आल्यानंतर पाटणमधील प्रवासी त्या एसटीमध्ये बसले होते. यात कोयना (गोवारे) येथे जाण्यासाठी सीताराम सिरू येडगे हे देखील प्रवास करत होते. त्याचदरम्यान तिकीट काढल्यानंतर येडगे यांचे पैशाचे पाकीट बसमध्ये सीटखाली पडले होते. सदर बस चिपळूणच्या दिशेने रवाना झाल्यानंतर वाहक सचिन ज्ञानदेव गरगडे यांना गाडीत सीटखाली पाकीट सापडले. त्यात सुमारे 15 हजार रुपये व काही कागदपत्रे आढळून आली.

त्यानंतर त्यांनी पाटण आगाराचे चालक अल्ताफ आतार व कोयनानगर (धक्का) येथील किराणा दुकानदार रविंद्र टोळे यांच्या सहकार्याने सीताराम येडगे यांच्याशी संपर्क साधला व सदर पैशाचे पाकीट वाहक सचिन गरगडे यांनी सोमवार दि. 28 रोजी पाटण आगारात येवून सीताराम येडगे यांच्याकडे सुपूर्द केले. या प्रामाणिकपणाबद्दल वाहक सचिन गरगडे यांना पाटण आगारातील चालक व वाहकांनी धन्यवाद दिले.