श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने ऑनलाइन आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

 

प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी योगाची प्रात्यक्षिके करताना

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
घोगाव ता.कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने ऑनलाइन आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी ऑनलाइन सहभागी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली.

या ऑनलाइन योगा कार्यक्रमात श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे सचिव प्रसून जोहरी, संस्थेच्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य सहभागी झाले होते.

प्रारंभी प्रा.संतोष पतंगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सर्व उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर डी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ वैशाली महाडिक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या मानवी जीवनात योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोरोना काळाच्या या जागतिक महामारीत योगा व प्राणायमचे महत्व सर्व जगाने अधोरेखित केले आहे. 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो म्हणून या दिवसाची योग दिन म्हणून निवड करण्यात आली. कोरोनाच्या या महाभयानक संकटात सर्वांनाच योगाचे महत्त्व समजले आहे. योगासना मुळे होणारे फायदे, मानसिक एकाग्रता, स्नायूंची बळकटी, रक्ताभिसरण प्रक्रिया, रक्तदाब नियंत्रणात येणे, पचनशक्ती वाढणे इत्यादीचे महत्व त्यांनी यावेळी समजावून सांगितले.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात संस्थेचे सचिव मा.प्रसुन जोहरी यांनी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षक , शिक्षकेतर स्टाफचे अभिनंदन केले व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.  या नंतर श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी थोडक्यात आंतरराष्ट्रीय योगदिन व योगाचे महत्त्व सांगून योग प्रार्थनेने योगाचा प्रारंभ केला व पूरक हालचालीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यामध्ये उभे राहून करावयाची आसने, बैठी आसने, पोटावर व पाठीवर झोपून करावयाची आसने याची प्रात्यक्षिके करून दाखवली त्याप्रमाणे ऑनलाईन उपस्थित सर्वांनी ती केली. त्याचबरोबर प्राणायम चे प्रकार ही करून दाखवले. शेवटी ध्यानधारणा, संकल्प व शांतीपाठ होवून योगासन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या तयारीसाठी दि. १० जून पासून ऑनलाईन योगा प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती.

या ऑनलाईन योगादिन कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सहभागी होऊन अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला.

 सदर कार्यक्रम फेसबुक लाईव्ह दाखवण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने यशस्वी होण्यासाठी प्रा. आदिनाथ पुरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या ऑनलाईन योग दिन कार्यक्रमासाठी सहभागी संस्थेच्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी या सर्वांचे प्रा. सागर माळी यांनी आभार मानले.