खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन वाढदिवशी दिव्यांगाना धान्यवाटप

 

मुंबई  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमूळे अनेकांचे रोजगार बुडाले.नोकऱ्या गेल्या.या परिस्थितीमध्ये अनेक राजकीय नेते, समाजसेवक आणि काही सामाजिक संस्था आपापल्या परीने या संकटात लोटलेल्या लोकांना मदत करताना आपण पाहिले.मात्र स्वतः आपली कोरोना योद्धाची २४ तास प्रामाणिकपणे ड्युटी पार पाडत असणाऱ्या खाकी वर्दीनेही आपले माणुसकीचे दर्शन घडविल्याची घटना चेंबूरच्या घाटले गाव भागात घडली आहे. गोवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी राजेंद्र घोरपडे यांनी आपल्या वाढदिवशी परिसरातील दिव्यांग नागरिकांना स्वखर्चाने मोफत धान्यवाटप केले.

राजेंद्र घोरपडे हे पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय दराडे ,पोलीस उपायुक्त के.के.उपाध्याय व गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अनेक सामाजिक उपक्रमात स्वतःला झोकून देताना दिसले आहेत.याच परोपकारी वृत्तीमुळे घोरपडे यांनी स्वतःच्या कौटुंबिक खर्चाच्या रकमेतून दिव्यांगाना अशी धान्यवाटपाची मदत केली आहे.या आगळ्यावेगळ्या उपक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे ,स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी आणि स्थानिक नागरिक कोरोना नियमाचे पालन करत उपस्थित होते.