प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्तांना मदत द्यावी: सत्यजितसिंह पाटणकर


ढगफुटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना पं.स.सभापती राजाभाऊ शेलार, गटविकास अधिकारी मिना साळुंखे व ग्रामस्थ.

पाटण  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पाटण तालुक्यात ढगफुटीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. डोंगरभागातील गावांमधील अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत, अनेक ओढ्यांवरील फरशी पुल वाहून गेल्याने, रस्त्यावर वृक्ष पडल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे पाटण शहरासह अनेक गावांतील घरांची पडझड झाली आहे. प्रशासनाने त्वरित घटनास्थळी जाऊन पंचनामे करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

            या प्रसिद्धी पत्रकात पाटणकर पुढे म्हणाले, ढगफुटीमुळे पाटण शहरासह ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबवणे, घाणव, तारळे, चाफळ या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे ओढ्यांच्या पाण्याचे प्रवाह बदलून ते पाणी शेतात घुसले आहे त्यामुळे नुकतेच पेरणी केलेले पुर्ण पिक वाहून गेले आहे. अगोदरच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात या पावसामुळे संपूर्ण पिक वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पेरणीसाठी त्वरित मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावेत असे त्यांनी सांगितले. जर या शेतकऱ्यांना मदत देण्यात विलंब झाला तर पेरणीचा कालावधी निघून जाईल प्रशासनाने याची नोंद घ्यावी असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अनेक ओढ्यांवरील साकव, फरशी पुल वाहून गेल्याने, रस्त्यावर वृक्ष पडल्याने, दरी कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करुन लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करावी व वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी. पावसाळा नुकताच सुरू झाला आहे योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर संपूर्ण पावसाळ्यात या गावांचा संपूर्ण तुटेल असेही पाटणकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

          या ढगफुटीमुळे पाटण शहरासह अनेक गावांतील घरांची पडझड झाली आहे. काही ठिकाणी लोकांचे संसार साहीत्य वाहून गेले आहे, जनावरे वाहून गेली आहेत अशा लोकांना तत्काळ मदत मिळाली पाहिजे त्याबरोबरच या लोकांची तात्पुरती निवासाची पर्यायी व्यवस्थाही करण्यात यावी अशी सुचनाही त्यांनी प्रशासनाला केली. 

              पाटणकर यांच्या सुचनेनुसार पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार व गटविकास अधिकारी मिना साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली व नागरीकांना धीर दिला. लवकरात लवकर प्रशासनामार्फत मदत केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी पत्रकार, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.