रॅगिंग रोखण्यासाठी प्रयत्न गरजेचे : ॲड.सुर्यकांत मिरजे.

श्री संतकृपा इंजिनिअरिंग महाविद्यालया मध्ये ऑनलाईन वेबीनार संपन्न.


ऑनलाईन वेबिनार मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲड.सुर्यकांत मिरजे.

उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व तसेच त्यांच्या भवितव्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे अशा घटना रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत. रॅगिंग होत असल्यास अथवा मुलींची छेडछाड होत असल्यास त्यांनी तक्रार द्यावी असे आवाहन विशेष सरकारी वकील सुर्यकांत मिरजे यांनी केले.

घोगाव ता.कराड येथील श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्यावतीने आयोजित वेबीनारमध्ये विशेष सरकारी वकील सुर्यकांत मिरजे बोलत होते. रॅगिंग व महिलांवर होणारे अत्याचार व त्यासंबंधी कायदे' या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नवनियुक्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्राजक्ता जरग, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सौ. कांचन सोनवणे यांनीही मार्गदर्शन केले. न्याय दंडाधिकारी पाटील यांनी आपला न्यायाधिश पदापर्यंतचा प्रवास सांगितला. बारावी पर्यंत सायन्स शाखेत व नंतर विधी शाखेच्या अभ्यासक्रमाकडे वळल्याचे सांगितले. त्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सौ. कांचन सोनवणे यांनी आपल्या पदापर्यंतचा प्रवास सांगून सर्वसाधारण इंजिनिअरिंग व मेडिकल कॉलेजमध्ये होते त्याबाबत माहिती दिली. तसेच मुलींनी अधिकारी होण्याची, प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पहावे व त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे, असे आवाहन केले. 

विद्यार्थ्यांना पुढे मार्गदर्शन करताना विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे म्हणाले, रॅगिंग मुळे अनेक विद्यार्थी त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करतात. रॅगिंग रोखण्याची जबाबदारी कॉलेज, विद्यापीठ व शैक्षणिक संस्था यांची आहे. रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू न देणे, त्याचा निकाल रोखणे, त्याची शिष्यवृत्ती रद्द करणे, तसेच प्रसंगी त्यास निलंबित करण्याचा अधिकार कॉलेजला असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंग विरोधी कायद्याची माहिती दिली. रॅगिंग होत असल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले. महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत बोलताना त्यांनी निर्भया खटला, कोपर्डी खटला या घटनांमुळे समाज मनावर झालेल्या परिणामांची माहिती दिली. तसेच माजी पोलीस अधिकारी केपीएस गिल यांना एका महिला अधिकारी यांच्या बाबत केलेल्या गैरवर्तनाबाबत सुप्रीम कोर्टाने शिक्षा केल्याचे सांगितले. चित्रपट तसेच विविध वाहिन्यावर दाखवण्यात येणाऱ्या चुकीच्या गोष्टीमुळे महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी सांगितले. महिलांसाठी पोलिसांनी निर्भया पथक स्थापन केल्याचे सांगून मुलींनी छेडछाड होत असल्यास निर्भया पथकाकडे तक्रार करण्याचा सल्ला सरकारी वकील मिरजे यांनी दिला. महिलांवर अत्याचार होत असल्यास त्यांनी अन्याय सहन न करता पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले. महिलासंबंधी कायद्याची माहिती देऊन कायदा हा महिलांच्यासोबत असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमास कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, संस्थेचे सेक्रेटरी प्रसून जोहरी, विधी शाखेच्य विद्यार्थीनी अमृता यादव महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज