कु.तेजस्विनी चोरगेची सहाय्यक वाहन निरीक्षक पदी नियुक्ती

 

तळमावले  | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
गलमेवाडी तालुका पाटण या ग्रामीण विभागातील कु.तेजस्विनी भरत चोरगेची, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदी नूकतीच नियुक्ती झाली आहे. तेजस्विनी चोरगे हिचे मूळ गाव गलमेवाडी ता पाटण सद्या तिचे कुटुंब तळमवाले येथे रहात आहे. वडील भरत चोरगे व्यवसायाने टेलर असून कुटूंबाची मोठी जबाबदारी असल्याने घरची परिस्थिती तशी बेताची, मुलांचे शिक्षण, प्रपंचाला लागणारा खर्च याचा सारासार विचार करून 1991 साली तळमावले येथे टेलरींग व्यवसाय सुरु केला. दोघे पती पत्नी यांनी रात्र दिवस कष्ट करून मुलांना शिक्षण देण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. मुलगी तेजस्विनीचे प्राथमिक शिक्षण जि.प.शाळा , माध्यमिक शिक्षण श्री वाल्मिक विद्यामंदीर तळमावले, व कॉलेज काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले येथे पूर्ण केले, तर गव्हर्मेंट कॉलेज कराड येथे मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पूर्ण केला.नंतर 3 वर्ष पुणे येथे अभियांत्रिकी पदवी शिक्षण पूर्ण केले. यानंतर, MPSC- परीक्षेची तयारी सुरू केली. सन 2017-18 ला MPSC उत्तीर्ण होऊन मोटर वाहन निरीक्षक पदी निवड झाली.नूकताच तिने पिपंरी चिंचवड येथे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला. 

एका ग्रामीण विभागातून, घरची परस्थिती बेताची असताना प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत अहोरात्र अभ्यास करून तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल संपूर्ण तळमावले व कुंभारगाव विभागात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. दैनिक कृष्णाकाठशी बोलताना तेजस्विनी चे आई - वडील म्हणाले की तेजस्विनी लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. तिची जिद्द, प्रचंड इच्छाशक्ती अभ्यासातील सातत्य व परिश्रम यातून तिने हे यश संपादन केले. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल आम्हाला, आमचे कुटुंबाला सार्थ अभिमान आहे.   

यावेळी तिच्या आई-वडिलांच्या मध्ये एक वेगळा आत्मविश्वास वाटत होता.त्यांचे डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. आम्हाला मुलीचा सार्थ अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली व आनंद अश्रूंना वाट मोकळी केली.

दैनिक कृष्णाकाठ व कृष्णाकाठ परिवाराच्या वतीने तेजस्विनीचे तिच्या या यशाबद्दल खास अभिनंदन....!