जिल्ह्यातील एमआयडीसीत अग्निशमन केंद्र सुरु करा : खा. श्रीनिवास पाटील.

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
    औद्योगिक परिसर व तेथे काम करणा-या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी तासवडेसह जिल्ह्यातील अन्य एमआयडीसीत अग्निशामक केंद्र सुरू करा अशा सूचना खा. पाटील यांनी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिका-यांना केल्या.

     कराड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, एमआयडीसी, वीज वितरण कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांची संयुक्त बैठक गुरूवारी तासवडे( कराड) येथील एमआयडीसी मध्ये पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. उद्योजकांसमोर असलेल्या समस्या सोडविण्यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर व कराड येथील एमआयडीसींचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीचे अधिकारी, राष्ट्रीेय महामार्ग प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी व पोलिस अधिकारी उपस्थित होते.



     खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यात आग लागून झालेल्या दुर्घटनेप्रमाणे जिल्ह्यात तशी दुर्घटना होवू नये. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व एमआयडीसीमध्ये अग्निशमन केंद्र सुरू करण्यात यावीत. कराड येथे व जिल्ह्यातील अन्य एमआयडीसीमध्ये जेथे अग्निशमन केंद्रे नाहीत तेथे अग्निशमन केंद्रे सुरु करावीत. ही कार्यवाही उद्योजकांना विश्वासात घेऊन करावी अशी सूचना महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाचे डेप्युटी चिफ अग्निशमन आधिकारी मिलिंद ओगले यांना केली. कामगार राज्य विमा महामंडळामार्फत हॉस्पिटल सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. उद्योगांना वीजेचा तुटवडा भासत असून त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. वीजपुरवठा खंडित झाला तर उद्योजकांचे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी एमआयडीसीने वीज पुरवठा करणारी यंत्रणा, खराब झालेल्या तारा दुरूस्त करून घ्याव्यात. तसेच स्थानिक मागणीनुसार वीज वितरण कंपनी मार्फत येथे 110 केव्हीचे सब स्टेशन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

     तत्पूर्वी तासवडे येथे एमआयडीसीची स्थापना झाल्यापासून त्या एमआयडीसीमध्ये अद्याप अग्निशमन केंद्र नाही. अग्निशमन केंद्रासाठीची जागा एमआयडीसीने राखीव ठेवली असतानाही अग्निशमन केंद्र स्थापन झाले नाही. आग लागण्यासारखी दुर्घटना घडल्यास उद्योजकांना आर्थिक नुकसान तर सहन करावे लागतेच मात्र शिवाय जीवीत हानीचा मोठा धोका संभवतो. त्यामुळे कराड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन मार्फत अग्निशामन केंद्र सुरू करण्याची मागणी करून इतर समस्या असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र जाधव, अभय नांगरे, सागर जोशी व संजय पिसाळ यांनी यावेळी उपस्थित केल्या. याशिवाय औद्योगिक परिसरात वीज पुरवठा अखंडीत सुरू रहावा, वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात तो पुन्हा सुरळीत व्हावा. कामगार राज्य विमा महामंडळामार्फत हॉस्पिटल सुरू व्हावे. एमआयडीसीसाठी राष्ट्रीय महामार्ग रस्त्याला दोन जोड रस्ते सुरू करावेत. एमआयडीसी मध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटरमधील तळमजल्यावर कराड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशा विविध मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

     यावेळी एमआयडीसीचे मुख्य अभियंता एस.आर.तुपे, कार्यकारी अभियंता आर.एस.गावडे, प्रादेशिक अधिकारी इंगळे, डेप्युटी चीफ अग्निशामन अधिकारी मिलिंद ओगले, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता श्री.राख, अधिक्षक अभियंता कुंभार मॅडम, राष्ट्रीय महामार्गचे वसंत पंदरकर, धनाजी साळुंखे, डीवायएसपी डॉ.रणजीत पाटील, ए.बी.पाटील, संदीप पवार, स्वप्नील जाधव, एस.डी.मोरे, पोलिस उपनिरिक्षक जयश्री पाटील, कराड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे सदस्य संजय पिसाळ, सागर जोशी, अमोल जमदाडे, अधिकराव डुबल, प्रसाद कुंभार, राजेंद्र पाटील, राजेंद्र सुर्यवंशी, श्री.रामदुर्गकर, गिरीश ताम्हणकर, वैभव थोरात, डॉ. सुनिल मुळीक उपस्थित होते. प्रारंभी स्वागत जितेंद्र जाधव यांनी केले.आभार अभय नांगरे यांनी मानले.