लोकसहभाग व समाजप्रबोधन यातून कोरोनामुक्त गाव चळवळीला चालना मिळेल : सरपंच रविंद्र माने

 तळमावले  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : आदर्श निर्मल ग्राम मान्याचीवाडी गावाला जे यश प्राप्त झाले आहे . त्यामध्ये काकासाहेब चव्हाण कॉलेजचा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा मोलाचा वाटा आहे . मी स्वतः सदस्य, उपसरपंच आणि सध्या गावचा सरपंच म्हणून कामकाज करीत आहे . मला घडविण्यात रा.से.योजना विभागाचे फार मोठे योगदान आहे . मान्याची वाडीला केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार मिळाले आहेत, याचे सर्व श्रेय गावातील युवक, ज्येष्ठ नागरिक , महिला वर्ग, ग्रामस्थ व तळमावले महाविद्यालयाचा रा.से.योजना विभाग यांना जाते . लोकसहभाग व समाजप्रबोधन, एकजूट याद्वारे आपण कोरोनाला रोखू शकतो याचा आदर्श निर्मलग्राम मान्याची वाडीने घालून दिला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील मान्याची वाडी गावाने कोरोनाचा गावात शिरकाव होऊ दिला नाही . हे केवळ जनजागृती व समाजप्रबोधन यामुळे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन मा. रविंद्र माने यांनी केले . श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांचे वतीने ' घाबरू नका, आम्ही आपल्या पाठिशी आहोत ' हा संदेश घेऊन विविध उपक्रम सुरू आहेत . या उपक्रमाला शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या ' माझ गाव कोरोना मुक्त गाव ' अभियानाची साथ लाभली . कोरोना संदर्भात जनजागृती व चळवळीला चालना देण्यासाठी काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथील राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वतीने 'ग्रामस्थ व रा. से. योजना स्वयंसेवकांच्या सहभागातून कोरोना मुक्ती ' या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अजय जायभाये संचालक रा. से. यो. विभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर हे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण गाडे हे होते . या ऑनलाईन कार्यक्रमास तळमावले ग्रामपंचायत सरपंच सौ. शोभाताई भुलूगडे तसेच तळमावले पंचक्रोशीतील विविध गावांचे सरपंच, सदस्य व महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते . प्रा. अजय जायभाये म्हणाले, कोरोनाच्या या महामारीत जर आपल्याला जिंकायचे असेल तर गावातील सरपंच, युवकांनी, ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे संघटन होणे गरजेचे आहे . तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावागावातील तरुणांनी समाजाला जागृत करावे . सामजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे व सॅनिटायझर व साबणाने वारंवार हात स्वच्छ ठेवणे या त्रिसूत्रीचे महत्व समजावून द्यावे . 'माझे कुटुंब ,माझी जबाबदारी , 'मी माझाच रक्षक ' या उक्तीप्रमाणे सर्वांनी जर नियमांचे पालन केले तर निश्चितच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर रा.से.योजनेचे जे उद्दिष्ट आहे कि, 'घाबरू नका , आम्ही आपल्या पाठीशी आहोत' हा हेतू सफल होईल . व नक्कीच आपण कोरोनावर विजय प्राप्त करू शकतो.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा प्राचार्य डॉ. अरूण गाडे ( सदस्य ,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण, संस्था टास्क फोर्स) म्हणाले, महाविद्यालयात ढेबेवाडी भागातील सरपंच, सदस्य, व प्रतिष्ठित ग्रामस्थ यांची कार्यशाळा करुन आयोजित जनजागृतीचे धडे देता येतील . विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करुन लोकांच्यात सकारात्मक उत्साह निर्माण करावा. समाजाला दिशादायक ठरेल अशा स्वरूपाची कामगिरी स्वयंसेवकांनी पार पाडावी असे आवाहन केले .

यावेळी स्वंयसेवक विद्यार्थी, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन प्रमुख पाहुण्यांनी केले . 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन पुजारी ( सदस्य, रा.से.यो विभाग ) यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महेश चव्हाण (प्रकल्प अधिकारी,रा.से.यो.विभाग ) यांनी केले. आभार प्रा. संभाजी नाईक ( प्रकल्प अधिकारी रा.से.यो.विभाग प्रमुख ) यांनी मानले.

Popular posts
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी
इमेज
साताऱ्यात राष्ट्रवादीला सुरुंग, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे भाऊ शिवसेनेत दाखल.
इमेज
पाटण बाजार समितीच्या सभापतीपदी बाळकृष्ण पाटील तर उपसभापतीपदी विलास गोंडांबे यांची निवड.
इमेज
मान्याचीवाडी गावाने पटकावला पन्नास लाख रुपयांचा माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार.
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायती तर्फे पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.
इमेज