मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एनसीबीने ड्रग्ज तस्करी करणाऱ्या एका झांबियाच्या माजी सैनिकाला चार किलो हेराँइनसह नुकतीच रंगेहाथ अटक केली. केनिथ मुलोवा असे या ड्रग्ज तस्कराचे नाव आहे.
एनसीबीला विमानतळ परिसरात एक व्यक्ती ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी केनिथला पकडण्यासाठी विमानतळावरील कर्मचाऱ्यांचा पेहराव केला होता. केनिथ हा विमानतळावर कोविड तपास यंत्रणांची नजर चुकवून जात असल्याचे तपास यंत्रणांच्या लक्षात आले. त्यावेळी त्याच्या संशयित हालचालींवरून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. केनिथला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या बॅगेची झाडाझडती घेण्यात आली. संशयित बॅगेत तीन कप्पे होते. त्यात हे हेराँईन एका विशिष्ठ केमिकलद्वारे लपवण्यात आले होते. या ड्रग्जची बाजारात कोट्यावधी रुपये किंमत आहे, अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.