मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्य गुप्तचर विभागाच्या माजी संचालक आणि आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना अटक करणार नाही अथवा कुठचीही सक्तीची कारवाई करणार नाही, अशी हमी आज राज्य सरकारतर्फे विख्यात वकील दरियस खंबाटा यांनी दिल्यानंतर मुंबई हायकोर्टाने हैदराबाद येथील घरी जाऊन रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदविण्याची परवानगी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला दिली.
न्यायमूर्ती एस.एस. शिंदे व न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. रश्मी शुक्ला यांना अटक न करण्याची हमी दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रश्मी शुकला यांची त्यांच्या हैदराबाद येथील घरी जाऊ उलट तपासणी करण्याची परवानगी दिली. क्रिमिनल प्रोसीजर कोडच्या कलम १६० अन्वये मुंबई पोलीस रश्मी शुक्ला यांचा जाबजबाब नोंद होऊ शकतात. पुढील सुनावणी पर्यंत मुंबई पोलिसांनी कुठचीही सक्तीची कारवाई करू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे रश्मी शुक्ला यांच्यावतीने आज दिल्लीतील ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. राज्य सरकारने रश्मी शुक्ला यांना नमवण्यासाठी बोगस आणि तकलादू खटला दाखल केला आहे, असे शुक्ला यांचे दुसरे वकील समीर नांगरे यांनी सांगितले. रश्मी शुक्ला यांच्या जबाब नोंदविण्याच्या प्रक्रियेचे व्हिडीओ शूटिंग केले जाणार आहे.