दुसरी लस घेताना पुन्हा नोंदणी करणे सक्तीचे केल्याने नागरिक प्रचंड त्रस्त

 राजेंद्र नगराळे यांची फेरविचाराची मागणी.मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक लस दुसऱ्या वेळेस घेताना प्रशासनाने अचानकपणे पुन्हा नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याने हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. लस घेणे आवश्यक असतानाही त्यामुळे रुग्णालयात येऊन नोंदणीसाठी पुन्हा घरी परतावे लागत आहे. तरी या दुसऱ्या लसीवेळी पुन्हा नोंदणी करण्याच्या निर्णयावर फेरविचार करून अशा ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी चेंबूरच्या माजी नगरसेविका सीमाताई राजेंद्र माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र नगराळे यांनी मुख्यमंत्री , मुंबई महापौर ,पालिका आयुक्त ,आणि आरोग्य समितीकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनानुसार , राज्यातील ४५ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना लस देण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर सध्या दुसरी लस देण्यास सुरुवात झाली आहे.

मात्र पहिली लस घेतली त्यावेळी डॉक्टर आणि प्रशासनाने सांगितले होते की दुसरी घेण्यासाठी पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही .त्यामुळे कुणीच पुन्हा नोंदणी केलेली नाही . मात्र आता लसीकरण केंद्रावर गेल्यावर त्यांना पुन्हा नोंदणी करणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्रस्त झालेले नागरिक प्रशासनाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे पुन्हा त्रस्त झाले आहेत. त्यात अनेक नागरिकांकडे मोबाईल

नसल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे.त्यामुळे पुन्हा नोंदणी करण्याचा हा निर्णय मागे घेण्यात यावा .तसेच खासगी व सरकारी रुग्णालयातील कर्मचारी घरी गेल्यावर कुटुंबाच्या संपर्कात येत असल्याने कुटुंबातील सदस्यांना लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणीही राजेंद्र नगराळे यांनी केली आहे.