मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : " बिग बॉस " फेम विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ याला काल मुंबई पोलिसांनी दादर येथील शिवाजी पार्क परिसरातून ताब्यात घेतले. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
हिंदुस्थानी भाऊ हा १२ वी बोर्डासह इतर परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहे. यासाठी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानात आंदोलन करणार असल्याची माहिती हिंदुस्थान भाऊने शुक्रवारी दिली होती.
त्याला रोखण्यासाठी मुंबई पोलिसही सज्ज झाले होते. मात्र हिंदुस्थानी भाऊ पोलिसांना चकमा देत आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करत गनिमी काव्याने रुग्णवाहिकेमध्ये बसून शिवाजी पार्क येथे पोहोचला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी शिवाजी पार्क येथे धाव घेत हिंदुस्थानी भाऊला ताब्यात घेतले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच आपत्कालीन कारणांशिवाय रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. या प्रतिबंधाचे हिंदुस्थानी भाऊने उल्लंघन केले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु केली असल्याची माहिती झोन ५ चे डीसीपी प्रणय अशोक यांनी दिली. तसेच हा केवळ प्रसिद्धी स्टंट असल्याचेही अशोक यांनी सांगितले.