कार्यमुक्त बीएएमएस डॉक्टरांना सेवेत घ्या : खा.श्रीनिवास पाटील

आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांचेकडे मागणी.

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

     आरोग्य सेवेतील एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नव्याने होत असलेल्या नेमणुकांसोबतच वेगळ्या गट व पदाची निर्मिती करून कार्यमुक्त केलेल्या बीएएमएस वैद्यकीय अधिका-यांना देखील नेमणूक द्यावी. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना सेवेत समाविष्ट करून त्यांचा उचित सन्मान करावा अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांचेकडे केली आहे.

    गत दोन वर्षांपासून कोविड-19 सारख्या महामारीत काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना आता सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. त्यासंदर्भात सातारा जिल्ह्यातील काही बीएएमएस वैद्यकीय अधिका-यांनी खा.श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य सेवेत पुन्हा समाविष्ट करून घ्यावे अशा मागणीचे निवेदन देऊन यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी विनंती खा.पाटील यांना केली होती. 

     याबाबत खा.श्रीनिवास पाटील यांनी आरोग्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीशी लढताना अशा बीएएमएस डॉक्टरांनी चांगली सेवा दिली आहे. मात्र अलीकडे शासनाकडून बंधपत्रित एमबीबीएस अहर्ताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या आहेत त्या स्वागताहार्य आहेत. मात्र पूर्वी नेमलेल्या बीएएमएस अहर्ताधारक वैद्यकीय अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात सुमारे 1200 बीएएमएस अहर्ताधारक वैद्यकीय अधिकारी आता कार्यमुक्त झाले आहेत. परंतू अशा पदमुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा नेमणूक देण्यात यावी. त्यांनी संकटकाळी दिलेल्या आरोग्य सेवेतील योगदानाची सहानुभूती पूर्वक दखल घ्यावी. तसेच भविष्यातील संभाव्य महामारी संकटांचा विचार करता त्यांची लागणारी गरज व महत्व पाहून त्यांना पुन्हा संधी देण्यात यावी.

     एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नव्याने होत असलेल्या नेमणुकांसोबतच वेगळ्या गट व पदाची निर्मिती करून कार्यमुक्त बीएमएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुध्दा सेवेत समाविष्ट करून घ्यावे. भविष्यकाळात महामारीशी लढताना व शासनाच्या विविध वैद्यकीय सेवा दुर्गम भागात प्रभावीपणे राबवण्यासाठी आशा बीएएमएस उमेदवारांचा योग्य वापर होऊ शकेल. तसेच पुन्हा अशा सेवकांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर विचार होऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी खा.पाटील यांनी केली आहे.