आ. पृथ्वीराज चव्हाण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कोरोना विरुद्धच्या लढाईत अग्रेसर ; तालुक्यातील जनतेला दिलासा.
कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता नवीन 110 बेडचे नियोजन.

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत बेडची कमतरता लक्षात घेता मागील वर्षीच्या पहिल्या लाटेत माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्याप्रकारे मैदानात उतरून जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहून मदत केली त्याप्रमाणेच सद्याच्या दुसऱ्या लाटेत सुद्धा आ. पृथ्वीराज चव्हाण कोरोना विरुद्धच्या लढाईत उतरले आहेत. त्यांनी वेळोवेळी प्रशासकीय आढावा बैठका घेतल्या व त्याप्रकारे योग्य ते नियोजन केले. सद्या बेडची उपलब्धतेची गरज लक्षात घेता आज एकाच दिवशी कराड येथे स्व यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे ५० बेड्चे, वडगाव हवेली येथे ३० बेड्चे व उंडाळे येथे ३० बेड्चे असे एकूण ११० बेडची व्यवस्था कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाली आहे. हे उदघाटन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडा नाना जगताप, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, नगरसेवक तथा शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, डॉ. प्रमोद जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी, संगीता देशमुख, मंडलाधिकारी महेश पाटील, उंडाळेचे उदय पाटील (आबा), कराड दक्षिण काँग्रेसचे प्रवक्ते तानाजी चौरे आदी यावेळी उपस्थित होते. 

 या उदघाटन प्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि , कोरोना हि महाभयानक महामारी आहे. अशी महामारी १०० वर्षांपूर्वी आली होती ज्याला आपण स्पॅनिश फ्लू नावाने ओळखतो त्यावेळी हजारो माणसे मृत्युमुखी पडली होती. परंतु त्याचीच दुसरी लाट आली त्यावेळी त्याचा परिणाम पहिल्या लाटेपेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. याचप्रमाणे १०० वर्षानंतर कोरोना हि महामारी आली आहे. याच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट आली आहे. या लाटेसाठी सज्ज राहून मुकाबला केला तरच टिकाव लागू शकेल परंतु आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी जानेवारी महिन्याच्या शेवटी केलेल्या आपल्या भाषणात सांगितले कि, भारताने कश्याप्रकारे कोरोनावर मात केली याचा बडेजाव त्यांनी संपूर्ण जगासमोर मारला यामुळे आपल्या देशातील यंत्रणा ढिली पडली व पुढे उदभवलेल्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यास आपण कमी पडलो आहोत. परंतु आता प्रशासनाने व राज्य सरकारने कंबर कसली आहे कोरोनाला हद्द पार करण्याची वेळ आली आहे आणि यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असून सर्वांचे लसीकरण होणे तितकेच गरजेचे आहे. 

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासकीय आढावा घेऊन आज कराड येथील बहुउद्देशीय हॉल, वडगाव हवेली व उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालय अश्या तिन्ही ठिकाणी ११० बेड्चे नियोजन कोरोना रुग्णांवर उपचारासाठी केले आहे. हे बेड त्वरित कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. याचसोबत लसींचा तुटवडा जरी होत असला तरी लसीकरणाचे योग्य नियोजनहि केले जाणार आहे. अश्या प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करून कोरोनाला हद्दपार करण्याची आपणा सर्वांची जबाबदारी असल्याचे हि यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.