मार्ड डॉक्टरांचे शिष्टमंडळ गाऱ्हाणी घेऊन पोहोचले "कृष्णकुंज" निवासस्थानी.

मुंबई  | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईतील मार्डचे निवासी डॉक्टर कोरोना योद्धे म्हणून मुंबईच्या सायन, नायर, केईएम आणि कूपर रुग्णालयात अहोरात्र काम करीत आहेत. या कोरोना योद्ध्यांना मुंबई महापालिकेकडून देण्यात येणारा १० हजार रुपयांचा कोव्हिड भत्ता गेले ११ महिने मिळालेला नाही. कोव्हिड भत्याची ही थकबाकी पालिकेकडून नामंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे हे ३,००० मार्डचे निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर जाणार आहेत. तत्पूर्वी आज या डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली व आपली गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करण्याची हमी दिली आहे.

 राज ठाकरे यांच्या "कृष्णकुंज" या निवासस्थानी आज सकाळी ११ वाजता मार्ड डॉक्टरांचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. मार्डच्या डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. मात्र महापालिकेने त्यांच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. डॉक्टर आणि राज ठाकरे यांना सांगितले की आम्ही कोरोना काळात उत्तम रित्या न थकता काम करीत आहोत. असून देखील आमचा कोव्हिड भत्ता मिळालेला नाही.त्याचप्रमाणे राज्यभरात डॉक्टरांच्या पगारातून टिडिएस कापला जात नाही. मात्र मुंबई महपालिका निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनातून टीडीएस कापत आहे. याशिवाय निवासी डॉक्टरांच्या अनेक समस्या आणि मागण्या आहेत. त्याचे निवेदनाच्या डॉक्टरांनी राज ठाकरे यांना दिले. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपण स्वतःहून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलणार असून गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही बोलू, अशी हमी या निवासी डॉक्टरांचा दिली.