पेट्रोल पंप, गॅस कर्मचाऱ्यांना लस द्या : खा.श्रीनिवास पाटील

 

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

पेट्रोल पंप कर्मचारी व घरगुती गॅस वितरक यांना फ्रंटलाइन वर्कर समजून करोना प्रतिबंधक लसीकरणात प्राधान्य द्यावे अशी सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. पेट्रोल-डिझेल पंप व घरगुती गॅस वितरण एजन्सी शिष्टमंडळाने तशी विनंती खा.पाटील यांना भेटून केली होती. त्यानुसार त्यांनी ही सूचना केली आहे.

     राज्यात निर्बंध लागू असले तरी पेट्रोल-डिझेल व गॅस ही उत्पादने व त्यांचे वितरण हे अत्यावश्यक सेवांमध्ये येत असल्याने ते सुरूच आहेत. ही सेवा देणा-या कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क येत असल्यामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे. वितरण एजन्सीच्या शिष्टमंडळाने खा.श्रीनिवास पाटील यांची गुरूवार दि. 20 रोजी भेट घेऊन सेवा बजावताना येणा-या समस्या व संभाव्य धोका निदर्शनास आणून दिला. शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीवरून खा.श्रीनिवास पाटील यांनी त्यासंदर्भातील पत्र लिहून जिल्हाधिका-यांना तशी सूचना केली आहे.

     खा.श्रीनिवास पाटील यांनी जिल्हाधिका-यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, करोना साथीच्या नियंत्रणासाठी सरकारकडून राबविल्या जात असलेल्या उपक्रमांमध्ये डिझेल-पेट्रोल पंप चालक व गॅस वितरक सहभागी होत असतात. ते विकत असलेली उत्पादने जीवनावश्यक सूचीतील असून लॉकडाऊनच्या प्रतिकूल काळातही जोखीम पत्करून त्यांची सेवा सुरूच असते. हे काम फ्रंटलाइन स्वरुपाचे असून त्यात जास्त जोखीम आहे. थेट घराघरापर्यंत एलपीजी गॅसचा पुरवठा करणारे कर्मचारी जर बाधित झाले तर त्यांच्यामुळे ग्रामीण भागातील नागरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. तसेच पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी अनेक नागरिक येत असतात. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचा सुध्दा प्रत्यक्ष संपर्क जनतेशी येत असतो. ग्राहक कोरोना बाधित असल्यास त्यापासून कर्मचाऱ्याला करोनाचा धोका उद्भवतो. तर कर्मचारी बाधित झाल्यास ग्राहकांना बाधा होण्याची शक्यता असते.

हे चित्र बदलण्यासाठी पेट्रोल पंपांवरील कर्मचारी व डीलर यांना फ्रंटलाइन वर्कर गृहित धरून लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. तसेच देशातील अर्थकारण व्यवस्थित चालावे यासाठी बँक कर्मचारी झटत आहेत. महामारीच्या काळात बँकींग सेवा विस्कळित होऊ न देता, देशाचे अर्थकारण अखंडित राहण्यासाठी सेवा बजावणाऱ्या बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील लसीकरण करताना प्राधान्य देण्यात यावे अशी सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.