कोरोना हॉटस्पॉट बनलेले बनपुरी गाव शंभर टक्के कोरोना मुक्त.

 






बनपुरी ता.पाटण गावातील शेवटचा रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांचे स्वागत करताना आरोग्य विभागाचे कर्मचारी.

तळमावले |कृष्णाकाठ वृत्तसेवा :

पाटण तालुक्यातील बनपुरी हे गाव काही दिवसापूर्वी कोरोना हॉटस्पॉट बनले होते . गेल्या महिनाभरात बनपुरी गावाने कोरोना बाधित रुग्णांची शंभरी गाठली होती इतक्या मोठ्या प्रमाणात या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासनही सतर्क झाले होते. यामुळे या गावाकडे आरोग्य विभाग व प्रशासनाचे अधिक लक्ष होते आरोग्य विभाग व ग्रामस्थांनी कोरोना हद्दपार करण्यासाठी कंबर कसली होती. कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे ग्रामस्थ काटेकोरपणे पालन करीत होते व आरोग्य विभागास सहकार्य करत होते, नियमांचे पालन केल्यानेच कोरोना रोखण्यात बनपुरी ग्रामस्थांना यश प्राप्त झाले आहे . आरोग्य विभागाचे परिश्रम व ग्रामस्थांचे सहकार्य यातूनच कोरोना वर मात करण्यासाठी हे गाव सज्ज झाले व आज आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नाने संपूर्ण गाव कोरोनामुक्त झाले. आज शेवटचा रुग्णही वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त झाला व काही दिवसापूर्वी कोरोनाचे हॉटस्पॉट असणारे बनपुरी हे गाव कोरोनामुक्त झाले. याचे सर्व श्रेय आरोग्य विभाग, कोरोना कमिटी, व ग्रामस्थांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे केलेले पालन याांना जाते. गेल्या महिन्याभरात शतकाकडे वाटचाल करणारे गाव आज  कोरोनामुक्त झाले.

आज शेवटचा रूग्ण विजय तानाजी कुंभार उपजिल्हा रुग्णालय कराड येथून उपचार घेऊन बरा होऊन घरी परतला त्याचे आज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर पूनम शिंदे ,आरोग्यसेवक भांडे, पडवी मॅडम व ग्रामपंचायत मार्गदर्शक सदस्य डॉ.शिवाजी पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

बनपुरी गावाचा आदर्श जिल्ह्यातील इतर गावांनी घेऊन इतर गावेही संपूर्ण कोरोनामुक्त होण्यासाठी ग्रामस्तरावर प्रयत्न होणे काळाची गरज आहे. तरच आपण कोरोनाला रोखण्यात यश मिळवू शकतो.

काही दिवसांपूर्वी हॉटस्पॉट बनलेल्या या गावावर पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोंपे यांचे विशेष लक्ष होते. यांनी वेळोवेळी बनपुरी गावात प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांना,आरोग्य विभागास व पोलीस प्रशासनास विशेष सूचना केल्या व त्या सूचनांचे काटेकोरपणे ग्रामस्थ  व आरोग्य विभागाने पालन करून हे गाव 100% कोरोनामुक्त करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे आरोग्य विभाग, ग्रामस्थ,  कोरोना कमिटी सदस्य व प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने आज बनपुरी गाव शंभर टक्के कोरोना मुक्त होत आहे.याचा विभागातील जनतेला आनंद होत आहे.