ढेबेवाडी येथील वांग नदीच्या पात्रात मगरीचा वावर ; ग्रामस्थ भयभीत.

 

संग्रहित फोटो :

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

        ढेबेवाडी येथील वांग नदीच्या पात्रात मगर दिसून आली असून यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वांग नदीत मासेमारी, तसेच नदीकाठी धुणेसाठी महिला मोठ्या प्रमाणात असतात तर नदीकाठी शेती पंपाच्या मोटरी असल्याने, शेतकऱ्यांची ये-जा होत असते.अशावेळी मगर कुणाच्या जीवावर उठू नये यासाठी तिचा वन्यजीव विभागाकडून बंदोबस्त व्हावा अशी लोकांची मागणी होत आहे.

           दोन दिवसांपूर्वी साईकडे येथिल कृष्णत उबाळे सकाळी 11.30 वाजणेच्या सुमारास जरुरी कामानिमित्त ढेबेवाडी येथे आले होते.घरी जाताना ते ढेबेवाडी येथिल संगम पुलावर आले असता त्यांना पाण्यात मोठी हालचाल दिसली म्हणून ते थांबले तर त्यांना पाण्यात मगर दिसून आली.यावेळी खालच्या जुन्या पुलाजवळ चार-पाचजण होते त्यांनी मगर पाहून धूम ठोकली.आजूबाजूला मासे पकडणारे तसेच शेतीमध्ये काम करणाऱ्या लोकांना उबाळे यांनी सावध केले. वांग नदी पात्रात मगर असणे धोकादायक असून अनेक शेतकऱ्यांच्या शेती पंपाच्या मोटरी नदी शेजारी आहेत त्यांना शेती पंपाची लाईट असेल त्यावेळी रात्री-अपरात्री मोटर चालू करणेसाठी जावे लागत असते त्यांच्या जीवावर कोणता प्रसंग बेतू नये याशिवाय नदीकाठी अनेक गावातील महिला कपडे धुणेसाठी जात असतात यांच्यासाठी ही फार धोकादायक बाब आहे.मासे पकडणारे अनेकजण उपजीविकेचे साधन म्हणून मासे पकडण्यासाठी नदी पात्रात जात असतात यांच्यावर कधीही जीवघेणा प्रसंग येवू शकतो.

____________________________________

मी स्वतः मगर पाहिली असून अचंबीत झालो.मगर फार मोठी आहे लोकांना याची माहिती दिली पाहिजे मी अनेकांना याविषयी कल्पना दिली असून, आजूबाजूच्या गावातील लोकांना याची माहिती दिली आहे ढेबेवाडी विभागात पहिल्यांदाच वांगनदीमध्ये मगर दिसून अली आहे ती कोणाच्या जीवावर बेतू नये यासाठी तिचा बंदोबस्त संबंधित विभागाने करावा.

कृष्णत शिवाजी उबाळे
निवृत्त पोलिस अधिकारी
       (साईकडे)         
 
                                         

____________________________________

वांगनदी संगमाजवळ शेतीच्या कामासाठी,कपडे धुण्यासाठी आमच्यातील महिला जात असतात त्यांना मगर असल्याची माहिती दिली आहे. मी वन्यजीवचे अधिकारी यांना माहिती दिली असून मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

आत्माराम पाचूपते,
सरपंच,पाचूपतेवाडी
 

____________________________________