मुंबई - दिल्लीत कोरोनाच्या लसीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली. मोदीजी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली? असा सवाल विचारला होता. अशा प्रकारची बॅनरबाजी मुंबईत देखील काँग्रेसने केली. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापणार आहे.
मुंबईतील घाटकोपर परिसरात कोरोना लसींसंदर्भात टीका करणारी पोस्टरबाजी करण्यात आली. आमच्या मुलांसाठी असणारी लस परदेशात का पाठवली?असा सवाल या पोस्टरमधून विचारण्यात आला आहे. सध्या तरी या बॅनरबाजीवर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. जागोजागी लावण्यात आलेले बॅनर महापालिकेकडून उतरवण्यात आले आहेत. बॅनर उतरवल्यावरून काही ठिकाणी काँग्रेस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. तर अनेक जण लसीकरण केंद्रावर जाऊनही लस मिळत नसल्याने हैराण आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुंबईत ठिकठिकाणी लागलेल्या पोस्टरमुळे राजकारण तापले आहे.