आता ‘संजू’ ही हाक ऐकू येणार नाही..!


माझं नाव ‘संदीप’ असलं तरी माझी आज्जी पहिल्यापासूनच मला ‘संजू’ या नावानेच हाक मारायची. संजू या हाकेत माया, ममता गोडवा होता. ती हाक आज काळाच्या पडद्याआड गेली आहे. अखेरच्या श्वासापर्यंत तिची प्रकृती धडधाकट होती. स्मरणशक्ती मात्र काही दिवसापासून कमी झाली होती. तिला माणसे ओळखता येत नव्हती. पण आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आठवणीने विचारपूस करायची. वयाच्या 110 व्या वर्षी आजीने अखेरचा श्वास घेतला. 

आठ दिवसापूर्वी आजीला भेटायला गेलो तर ती झोपून होती. तिला आवाज दिला, तर ती म्हणाली, ‘‘चांगलं हाय का, तब्बेतीची काळजी घ्या’’ हेच तिचे अखेरचे शब्द...आज्जीच्या या आठवणींने मन कासावीस झाले आहे.

मृत्यू हा निसर्ग चक्राचा भाग असला तरी व्यक्तीचे जाणे मनाला दुख देणारे असते. शेवटचे काही दिवस सोडले तर आजी स्वतःची कामे स्वतःच करत होती. 

आम्ही लहान असताना आजी ज्यावेळी डाकेवाडीला यायची तेव्हा तिने सोबत आणलेल्या पिशवीत काय खाऊ आहे याकडे कायम लक्ष असायचे. आज्जी देखील न चुकता काहीतरी खाऊ आणायची. 8-10 दिवस राहिल्यानंतर परत निघताना कमरेच्या बटव्यात हात घालून 50 पैसे, 1-2 रुपये देवून ‘तुला खाऊ घे’ असे म्हणत गालाचे मुके घेत तोंडावरुन हात फिरवत कडाडा बोटं मोडायची. कुणाची तब्बेत बरी नसली तर आजी घरगुती औषधे सांगायची.

आज सकाळी (शुक्रवार दि.28 रोजी) आजी गेली असा निरोप आला आणि आज्जीच्या असंख्य आठवणी डोळयासमोर येवू लागल्या. माझे मामा रामचंद्र सलते, मामी, त्यांची मुले, नातवंडे, मावशी, माझी आई यांनी अखेरच्या काळात आजीची खूप सेवा केली आहे.

विशेष म्हणजे या वयातही आजी काठी न घेता चालायची. आयुष्यातील अनेक चढ-उतार अनुभवाची शिदोरी असणारी ‘आज्जी’ आज आमच्यातून निघून गेली आहे. आजीचे ‘माझा संजू’ हे शब्द काळजात कायम घर करुन राहतील. आज्जीच्या आठवणींने अजूनही डोळयाच्या कडा ओलावत आहेत.

आजीच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..!


- डाॅ.संदीप डाकवे