काळगांव|संदीप डाकवे :
गेली दोन वर्षापासून कोरोना काळात ग्रामीण विभागात जीवापाड मेहनत घेतलेल्या कंत्राटी बी.ए.एम.एस.वैद्यकीय अधिकारी यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. जनतेच्या सेवेसाठी या अधिकारी लोकांनी कधीही हयगय केल्याचे दिसून येत नाही. या कठीण प्रसंगात जीवतोड काम करत असताना वेळेवर मानधन देखील मिळत नव्हते. अशी अवस्था विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी स्वरुपात नेमणूक दिलेल्या डाॅक्टरांची आहे. ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ ही म्हण कंत्राटी स्वरुपाच्या डाॅक्टरांनाच लागू होते की काय असे वाटल्यावाचून राहत नाही. 11 महिन्यांसाठी दिलेल्या नेमणूकीमुळे नोकरीवर टांगती तलवार आली आहे. त्यामुळे त्यांची प्रचंड घुसमट होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,
महाराष्ट्र शासनाने 15 जुलै, 2019 रोजी कंत्राटी पध्दतीने बीएएमएस व एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांना नेमणूका दिल्या. सदर नेमणूकांचा कालावधी हा 11 महिन्यांचा आहे. तो कालावधी जून महिन्यात संपणार आहे. तो नुतनीकरण झाला नाही तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी अक्षरशः ‘सलाईन’ वर आहेत. त्यांच्या जीवाची घालमेल होत आहे. या कर्मचाऱ्यांना अचानक सेवेतून कमी केले तर ते जाणार कुठे? असा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. पर्यायाने त्यांच्या कुटूंबालाही याचा मोठा फटका बसणार आहे.
तसेच जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस वेळ देणारे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांना त्यांच्या कामाचा मोबदला वेळेत मिळाला नाही. अगदीच काही दिवसापूर्वी त्यांना 8 महिन्यापैकी 4 महिन्याचा पगार मिळाला आहे. ही गोष्ट खूप खेदाची आहे. कोरोना आल्यापासून या लोकांचे कार्य दुर्लक्षून चालणार नाही. त्यांचे मानधन वेळेत मिळत नसले तरी या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कोणतीही कसून ठेवलेली नाही. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना सलाम करावा लागेल. 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक होत असते ही नेमणूक तात्पुरत्या स्वरुपाचे असल्याने त्यांना रजा, पी एफ व शासनाच्या अन्य सुविधांचा लाभ मिळत नाही.
वास्तविक कोवीड-19 च्या काळात या डाॅक्टरांनी केलेले काम नाकारता येणार नाही. ग्रामीण भागात दिवसरात्र काम करुन लोकांना सतर्क आणि अलर्ट ठेवण्याचे काम या लोकांनी केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यात या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इतर सहकाऱ्यांबरोबर राहत मोठे योगदान दिले आहे. अशा अधिकाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे इतरांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे ‘देवदूत’ सध्या मात्र प्रचंड ताणाखाली आणि दबावाखाली आहेत. त्यामुळे सदर वैद्यकीय अधिकारी यांना पुन्हा सेवेत घेवून कायम करावे अशी मागणी या डाॅक्टरांनी निवेदनाव्दारे केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने 15 जुलै, 2019 रोजी मुलाखती घेवून बी.ए.एम.एस., एम.बी.बी.एस. अर्हता धारकांच्या नेमणूका झाल्या. जाहीरात प्रसिध्दी करून महाराष्ट्र वैद्यकिय व सार्वजनिक आरोग्य सेवा गट अ वैद्यकिय अधिकारी पदांची भरती प्रक्रिया वारंवार राबवून सुध्दा एम.बी.बी.एस.अर्हता धारकांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे पदे रिक्त राहत होती. रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा डळमळीत झाली होती. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकिय व सार्वजनिक आरोग्य सेवा गट अ वैद्यकिय अधिकारी पदांची भरती प्रक्रिया नव्याने राबवून नवीन पदनिर्मिती करून कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ पद आस्थापनेवर बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांना 11महिन्यांसाठी नेमणूक देण्यात आली व रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार एकुण रिक्त पदांच्या फक्त 75 टक्के पदांची भरती प्रक्रिया नव्याने राबवून नवीन पद निर्मीती करून कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ म्हणून बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांना नेमणूक देणे अपेक्षित होते. जेणेकरून एम.बी.बी.एस.अर्हता धारक बंधपत्रित वैद्यकिय अधिकारी यांची नियुक्ती झालेस कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ यांना बदली नियुक्ती उर्वरित रिक्त 25 टक्के पदांवर करता येईल अशी प्रशासकीय सोय करण्यात आली होती.
परंतु सातारा जिल्हयात 67 पदे रिक्त होती व सर्व 67 पदांची भरती प्रक्रिया नव्याने राबवून कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. बंधपत्रीत एम.बी.बी.एस.अर्हता धारकाची नियुक्ती झालेस कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ म्हणून बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांना पद रिक्त नसल्याने कार्यमुक्त करण्यात येणार आहे.
बंधपत्रीत एम.बी.बी.एस.अर्हता धारकाची नियुक्ती ही 1 वर्ष कालावधीसाठी करण्यात येते. बंधपत्रीत एम.बी.बी.एस. अर्हताधारक हे पदव्युत्तर शिक्षण प्रवेशासाठी शासकीय बंधपत्र शक्तीचे असलेनेच पदस्थापना स्वीकारत असतात. बरेच वेळा बंधपत्रीत एम.बी.बी.एस.अर्हता धारक प्रत्यक्ष आरोग्यसेवा देत नसल्याचे निदर्शनास आले आहे व कागदोपत्री हजेरी पत्रक देवून बंधपत्रातील कालावधी पूर्ण करतात. त्यामुळे शासनाचा ग्रामीण भागात आरोग्य सेवा देण्याचा मुलभूत उद्देश सफल होत नसल्याचे दिसते व शासनाचे आर्थिक नुकसान होते. एम.बी.बी.एस.अर्हता धारकांचा बंधपत्रातील कालावधी पूर्ण झालेनंतर लगेचच नवीन बंधपत्र एम.बी.बी.एस.अर्हता धारकाची नियुक्ती होणेची शक्यता फार कमी असते त्यामुळे पद रिक्त राहून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा विस्कळीत होते.
कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ बी.ए.एम.एस. अर्हता धारक अतिशय चांगले कामकाज पाहत आहेत. ग्रामीण भागात आरोग्य सेवा नियमितपणे देत आहेत. परंतु 11महिन्याचा कालावधी समाप्तीनंतर देण्यात आलेल्या दि.13/08/2020 रोजीच्या पुनर्नियुक्ती आदेशामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अट क्र.3 नुसार बंधपत्रीत एम.बी.बी.एस.अर्हता धारकाची नियुक्ती झालेस कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांना देण्यात आलेली नेमणूक समाप्त करण्यात येईल असे नमूद केले आहे. शासन निर्णयानुसार 75 टक्के भरती प्रक्रिया न राबविल्याने कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांना प्रशासकीय कारणास्तव अन्यायकारकरित्या कार्यमुक्त व्हावे लागणार आहे. यामुळे कार्यमुक्त होणारे कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ बी.ए.एम.एस. अर्हता धारक यांचे कुटूंबावर आर्थिक संकट येणार आहे. महाराष्ट्र शासनाने वरील गोष्टींचा सहानभुतीपुर्वक विचार करावा. अशी मागणी वैद्यकीय अधिकारी यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
तसेच एम.बी.बी.एस. अर्हता धारक बंधपत्रित वैद्यकिय अधिकारी यांना ग्रामीण रूग्णालयाचे ठिकाणी प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी व त्यानंतरच प्राथमिक आरोग्य केंद्राचे ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी. बंधपत्रीत एम.बी.बी.एस.अर्हता धारक यांना प्राथमिक आरोग्य केंद्राचे ठिकाणी नियुक्ति देण्यात आलेस कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांना कार्यमुक्त न करता त्याच आरोग्य संस्थेमध्ये तृतीय वैद्यकीय अधिकारी गट ब पदस्थापनेवर नियुक्ति देण्यात यावी व त्यासाठी आवश्यक शासन निर्णय करावा अशी कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ म्हणून कार्यरत बी.ए.एम.एस. अर्हता धारक यांची नम्र विनंती आहे.
वास्तविक पाहता कोविड 19 साथीचा सामना करताना कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांनी अनियमित मानधन मिळत असताना सुध्दा सामाजिक जबाबदारी भान राखून व मानवतावादी दृष्टिकोन ठेवून, कोणतीही तक्रार न करता, कोरोना योध्दा म्हणुन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोविड साथ रोखण्यासाठी मोलाची कामगिरी पार पाडली आहे आणि अजुनही जबाबदारीने कार्यरत आहोत.
तसेच महाराष्ट्र वैद्यकिय व सार्वजनिक आरोग्य सेवा गट अ वैद्यकिय अधिकार पदांची भरती प्रक्रिया नव्याने राबवून नवीन पदनिर्मीती करून कार्यरत कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ बी.ए.एम.एस. अर्हता धारक व कंत्राटी वैद्यकिय अधिकारी गट अ एम.बी.बी.एस. यांना सेवेत घ्यावे.
महाराष्ट्र शासनाच्या 26 मे 1981 च्या शासन निर्णयानुसार आयुर्वेद बीएएमएस चिकित्सक व एॅलोपॅथी एमबीबीएस चिकित्सक यांना समकक्ष दर्जा आहे. वेतन आणि इतर समान धोरण लागू करण्यात आले आहे. तरीदखेील एमबीबीएस व बीएएमएस यांच्या मानधनात तफावत आहे. म्हणून कार्यरत बी.ए.एम.एस.अर्हता धारक यांचे मानधनातील तफावत दुर करणेसाठी सुधारित शासन निर्णय करण्यात यावा अशी मागणी कंत्राटी स्वरुपात काम करत असलेल्या बी.ए.एम.एस आर्हताधारक वैद्यकीय अधिकारी यांनी निवेदनाव्दारे केली आहे.
_____________________________________
आम्हाला समजलेल्या माहितीनुसार कोवीड काळासाठी तात्पुरते तीन महिन्याकरता तसेच बंधपत्रित बोंडेड वैद्यकीय अधिकारी यांची आरोग्य विभागात नियुक्ती होत आहे. त्यामुळे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची सेेवेत राहण्याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
कोरानाकाळात आम्ही सर्व लोकांनी स्वतःची कुटूंबाची आणि जीवाची पर्वा न करता शासनाच्या आदेशानुसार यशस्वी काम केले. आणि आताही त्याच उमेदीने अनुभवाच्या बळावर अधिक सक्षमतेने काम करण्यास सज्ज आहोत. तरी आम्हा कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांना सेेवेतून काढून टाकण्यात येवू नये. शिवाय ज्यांचा 11 महिन्याचा कालावधी संपला आहे त्यांना पुन्हा सेवेत ठेवून काम करण्याची संधी द्यावी.
- एक कंत्राटी वैद्यकीय अधिकारी
_____________________________________
बी.ए.एम.एस.डाॅक्टरांच्या अशा आहेत मागण्या :
नियमित सेवेत सामावून घ्यावे.
दरमहा वेळेवर मानधन मिळावे.
नवीन पदनिर्मिती करुन सेवेत समावेश करुन घ्यावे.
समान काम समान वेतन असावे.
_____________________________________