वाढती कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन. क्षेत्र माहुली व वडूथ येथील कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 


सातारा दि.3 (जिमाका): लॉकडाऊन लावूनही जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी वाढत आहे. ही वाढती साखळी तोडण्यासाठी आणि रुग्ण संख्या कमी करण्यासाठी उद्या 4 मे पासून सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

क्षेत्र माहुली व वडूथ येथील कोविड केअर सेंटरचे पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोतल होते. या उद्घाटनप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

राज्यात लॉकडाऊन असूनही राज्यासह जिल्ह्यात कांही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. आज लोकप्रतिनिधी व जिल्हा प्रशासनाशी चर्चा करुन उद्या म्हणजेच 4 मे पासून सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या कडक लॉकडाऊनची गाईडलाईन जाहीर करण्यात येणार असून जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

क्षेत्र माहुली व वडूथ येथील कोविड केअर सेंटरमध्ये प्रत्येकी 20 ऑक्सिजन व 10 जनरल बेड असे एकूण 30 बेड असणार आहेत.