अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुप्पट नफा.


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : भारतासह जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला मात्र यंदाच्या तिमाहीत गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट नफा झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात १३,२२७ कोटी रुपये नफा झाला आहे. तर गेल्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये याच काळात ६,३४८ कोटी नफा झाला होता.

टेलीकॉम, किरकोळ व्यापार आणि तेलउद्योगाचा या नफ्यामध्ये मोठा वाटा आहे. यंदाच्या वर्षी तेलउद्योगातून रिलायन्सला जास्त फायदा झाला. मार्च २०२१ मध्ये संपलेल्या वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचा महसूल कमी झाला होता. कारण याकाळात कंपनीचा एकूण आर्थिक व्यवहार ५.९८ ट्रिलीयनवरून ४.६ ट्रिलीयनवर घसरला होता. ही घसरण मुख्यत: कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये झालेली होती. कंपनीचा एकूण नफा ४९,१२८ कोटी रुपये आहे. त्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा २४.८ टक्यांनी वाढ झाली आहे.