दूषित पाण्यामुळे शेंडेवाडीच्या तलावातील मासे मृत्युमुखी ? ग्रामस्थ चिंतेत तर आरोग्य यंत्रणा सतर्क  • तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :

    शेंडेवाडी कुंभारगाव, ता. पाटण गावाजवळच्या तलावातील मासे अचानक मृत्युमुखी पडू लागल्याने ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

            कुंभारगाव ता पाटण येथून जवळच असणाऱ्या शेंडेवाडी येथील पाझर तलावात दोन दिवसापूर्वी मृत मासे पाण्यावर तरंगताना आढळून आले हि माहिती चिखलेवाडी ग्रामपंचायत सदस्य विक्रम वरेकर यांना मिळताच, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रसाद यादव, किशोर मोरे, रवींद्र माटेकर, यांनी पाझर तलावाची पाहणी केली, लहान,मोठे मासे पाण्यावर तरंगताना दिसले, तलावातील मासे अचानक मृत झाले, याची माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र तळमावले यांना देण्यात आली असल्याचे सदस्य विक्रम वरेकर यांनी सांगितले, 

         तलावापासून जवळच चिखलेवाडी, गलमेवाडी, वरेकरवाडी या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नळयोजनेची विहीर आहे. तलावातील पाणी झिरपून विहिरीत मिसळण्याची भीती असल्याने यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना मेडीक्लोरचे घरोघरी वाटप करण्यात आले असल्याचे ग्रामपंचायत सदस्य विक्रम वरेकर यांनी सांगितले.मासे नेमके कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडत आहेत. तलावातील पाण्यात कोणता विषारी घटक तर मिसळलेला नाही ना? याची तातडीने तपासणी होणे गरजेचे असल्याने तेथील पाण्याचे नमुने रासायनिक तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच माशांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोंजारी यांनी सांगितले.