माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही खंबीरपणे कामगारांचे पाठीशी आहोत : आ.प्रविण दरेकर

 


नवीमुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा :  कोणताही कायदा करताना त्या घटकाला विचारात घेण्याची आवश्यकता असते व समन्वयाची गरज असते, असा विचार न केल्यामुळे आज माथाडी कामगार उपासमरीच्या जवळपास टेकला आहे, माथाडी कामगार क्षेत्रात मोठ्या कार्पोरेट कंपन्यांनी प्रवेश केल्यामुळे शेतकरी, कामगार, व्यापारी असे सगळेच अडचणीत सापडले असून, यासाठी व्यापारी, कामगार, शेतकरी वर्ग यांच्याशी सल्लामसलत करुन ही समस्या सोडविली पाहिजे, पण ही समस्या सोडविताना सरकारी यंत्रणाही राहिली पाहिजे हा अत्यंत महत्वाचा भाग आहे, से वत्कव्य महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केले.

नवीमुंबईतील माथाडी भवन येथे आज पार पडलेल्या माथाडी कामगार, व्यापारी, वाहतुकदार कृती समितीशी संवाद करताना आमदार प्रविण दरेकर बोलत होते, ते पुढे असेही म्हणाले की, माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेत करुन, त्यांना रेल्वेने व सरकारी परिवहन वाहनांमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी, तसेच या घटकाला ५० लाखाचे विमा संरक्षण कवच द्यावे, व्यापा-यांना सकाळी १०-०० ते ३-०० किंवा ६-०० या वेळेत व्यापार करण्याची परवानगी द्यावी, वाहतुकदारांना रस्त्यावर उभे रहाण्यास येणारी अडचण दूर करावी या मागण्यांसाठी मी आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मागे खंबीरपणे उभे आहोत. यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित खात्याचे मंत्री, मुख्य सचिव यांचेशी चर्चा करुन आंम्ही या समस्या नक्कीच दूर करु, असे ठोस आश्वासनही प्रविण दरेकर यांनी दिले. त्यांनी वाशी रेल्वे स्थानकाबाहेर माथाडी कामगारांच्या न्याय हक्क सप्ताहास भेट देऊन माथाडी भवन येथे माथाडी, व्यापारी, वाहतुकदार कृती समितीशी संवाद साधला,

या संवादामध्ये बोलताना महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील म्हणाले की, आज माथाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेत काम करीत असून सुध्दा सवलती न मिळाल्यामुळे तो कामावर येण्यासाठी दुप्पट पैसे खर्च करुन खाजगी वाहनातून प्रवास करीत आहे, तर व्यापा-याच्या धंद्याची वेळ योग्य नसल्यामुळे व्यापारी वर्गही संतप्त आहे, आज गेल्या कित्येक दिवसापासून व्यापारी उधारीवर धंदा करीत असून, अशा अवस्थेमुळे त्यांचाही धंदा कांही दिवसानंतर ठप्प होण्याची शक्यता आहे, तेंव्हा माथाडी कामगार व अन्य घटकांना रेल्वे व बसने प्रवास करण्याची मुभा द्यावी तसेच कोव्हीड काळातील आमच्या ज्या इतर मागण्यां आहेत, याचाही सरकारने विचार करण्याची गरज आहे. रेल्वेने प्रवास करण्याची मुभा मिळण्यासाठी मध्य, पश्चिम व हार्बर लाईनवरील विविध रेल्वे स्थानकाबाहेर माथाडी कामगारांचा न्याय हक्क सप्ताह चालू असून, तो ८ मे पर्यंत चालणार आहे. माथाडी कामगारांना अत्यावश्यक सेवेत घ्यावे, रेल्वेने व सरकारी परिवहन बसने प्रवास करण्याची मुभा द्यावी, तसेच ५० लाखाचे विमा संरक्षण कवच मान्य करावे, व्यापा-यांच्या अडचणी दूर कराव्या इत्यादी मागण्यांचा सरकारने तत्काळ विचार न केल्यास आंम्हाला माथाडी कामगार व व्यापारी यांच्या संयुक्त कृती समितीमार्फत नाईलाजास्तव बेमुदत आंदोलन करावे लागेल, याचा सरकारने गांभिर्याने विचार करावा.

या संवादास उपस्थित असलेले ग्रोमाचे सदस्य निलेश वोरा, अमृतभाई जैन, भानुशाली, मयूर सोनी, भाजीपाला मार्केट असोसिएशनचे शंकरशेठ पिंगळे, कांदा-बटाटा मार्केटचे संजय पिंगळे, शुगर मार्केटचे अशोक जैन, वाहतुकदारांचे प्रतिनिधी राजेंद्र नवघणे, इत्यादी व्यापारी प्रतिनिधींनी कृषि उत्पन्न बाजार समितीशी निगडीत प्रश्नांची माहिती व अडचणी मांडल्या. तसेच मसाला मार्केटचे माथाडी कार्यकर्ते जितेंद्र येवले, कांदा-बटाटा मार्केटचे संभाजी बर्गे, मापाडी प्रतिनिधी श्याम धमाले, ट्रान्सपोर्टचे अनिल सपकाळ, भाजीपाला मार्केटचे कृष्णा पाटील, फळे मार्केटचे अंकलेश यादव उर्फ मजनू आणि महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ सखाराम जाधव यांनी माथाडी कामगारांच्या व्यथा मांडल्या, युनियनचे संयुक्त सरचिटणीस व जनसंपर्क अधिकरी पोपटराव देशमुख यांनी आभार व्यक्त केले. या सभेस संघटनेचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील व दिलीप खोंड उपस्थित होते.

कृती समितीशी संवाद साधून माथाडी कामगार व व्यापारी, वाहतुकदार यांच्या व्यथा समजून घेतल्या व त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले, त्याबद्दल युनियन व कृती समिती तसेच अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढीच्यावतिने महाराष्ट्र विधानपरिषदेचे प्रविण दरेकर यांचा सत्कार करण्यात आला.